दीपक केसरकरांचा शिवसेनेत प्रवेश

August 5, 2014 7:41 PM0 commentsViews: 2344

deepak kesarkar
 05 ऑगस्ट :  शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आज (मंगळवारी) अखेर शिवसेनेत प्रवेश केला. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या केसरकर यांनी कणकवली, सावंतवाडी भागामधील नारायण राणे यांची दादागिरी संपविण्याचा निर्धार करत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यानुसार आज येथे हजारो शिवसैनिकांच्या सभेमध्ये त्यांनी शिवसेना प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं.

राणे आणि केसरकर यांचे संबंध गेल्या काही महिन्यांमध्ये अत्यंत तणावग्रस्त झाले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंच्या विरोधात प्रचार करून त्यांचा दणदणीत पराभव झाल्यानंतर केसरकरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर केसरकरांच्या पक्षबदलाचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते. त्यानुसार केसरकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी केसरकरांसोबत त्यांचे 5 हजार समर्थक कार्यकर्तेही शिवसेनेत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं.

नारायण राणे व त्यांच्या समर्थकांच्या गुंडगिरीमुळे कोकणात दहशतवाद माजला आहे, या वाईट वृत्तीला आमचा विरोध आहे असे केसरकर यांनी सांगितलं. कोकणातील मतदार जागरूक असून त्यांना शांती आणि विकास हवा आहे, लोकसभा निवडणुकीत त्यांनी हेच दाखवून दिले असेही केसरकर यांनी नमूद केले. आता संपूर्ण कोकणाचा दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते शिवसेनेत आणू, असा शब्दही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

केसरकरांच्या शिवसेनेत जाण्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या नारायण राणेंविरोधातल्या लढाईला बळ मिळणार आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close