विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब

August 6, 2014 5:13 PM0 commentsViews: 2403

sonia gandhi and sharad pawar

06 ऑगस्ट : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्यावर एकमत झाले. तसेच आगामी काही दिवसांत जागावाटपावर चर्चा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा देशात दारुण पराभव झाला. त्याचा फटका राष्ट्रवादीलाही बसला. काँग्रेस-राष्ट्रवादीतली आघाडी मागच्या 15 वर्षांपासून कायम आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 171 तर राष्ट्रवादीने 117 जागा लढविल्या होत्या. मात्र लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसला दोन जागांवर तर राष्ट्रवादीला चार जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 50-50 म्हणजे 144-144 जागा लढविण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच ही मागणी मान्य नाही झाली तरी स्वबळावर लढू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्याला काँग्रेसनेही जोरदार उत्तर दिले होते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही अट न घालता जागावाटप झाले तरच आघाडी होईल अन्यथा नाही असं म्हटलं. तर राष्ट्रवादीला 144 जागा कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.

मात्र, आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यात तासभर बैठक झाली. तसेच आगामी विधानसभा दोन्ही पक्ष एकत्रच लढवतील असा निर्धार व्यक्त केला. आगामी काही दिवसांत जागावाटपावर चर्चा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close