मुख्यमंत्र्यांसोबत मतभेद नाहीत -राणे

August 6, 2014 7:49 PM0 commentsViews: 1105

Rane Exclusive
06 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणार्‍या नारायण राणेंनी आता यू-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आता कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा राणे यांनी IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिला आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त करत राणे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण मंगळवारी त्यांनी आपली तलवार म्यान करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. बुधवारी त्यांनी आयबीएन लोकमतशी या विषयावर बातचीत केली. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये सर्वांच्यासोबत एकदिलानं काम करणार असल्याचं सांगितलं. आता यापुढे पक्षांतर्गत किंवा आघाडीवर टीका करणार नाही, विरोधकांवर तुटून पडणार असं स्पष्ट केलं आहे.

मोदी सरकारकडून लोकांची निराशा झालीय, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच यश मिळेल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. यासाठी आता फक्त कोकणच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्र्यांमध्येही ती क्षमता असल्याचं सांगत राणेंनी मुख्यमंत्र्यांशी मतभेदावर पडदा टाकला. मुलगा नितेश राणे कणकवलीतून निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आपण कुडाळमधून निवडणूक लढवायला उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close