हाच का ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’?

August 8, 2014 10:06 PM0 commentsViews: 2820

सिध्दार्थ गोदाम, औंरंगाबाद

08 ऑगस्ट : अलीकडे रिलीज झालेला ‘पोश्टर बॉईज’ हा मराठी सिनेमा चांगलाच गाजतोय. नसबंदी केलेली नसतानाही शासकीय जाहिरातीत नसबंदी केली म्हणून तीन नायकांचे फोटो चुकून छापले जातात. त्यानंतर नायकांची काय नामुष्की होती या कथानकावर हा सिनेमा आहे. पण अशीच काहीशी गत झालीय बीड जिल्ह्यातल्या एका शेतकर्‍याची..गारपीटग्रस्त शेतकर्‍याला मिळालेल्या मदतीच्या जाहिरातीत त्याचा फोटो झळकतोय. पण प्रत्यक्षात हाती आल्यायत वाटाण्याच्या अक्षता…

सिनेमात दाखवण्यात आलेल्या ‘पोश्टर बॉईज’ची खरी खुरी व्यथा सध्या दादाभाऊ जाधव भोगत आहेत. बीडमधल्या या शेतकर्‍याचा फोटो गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या मदतीच्या जाहिरातीवर झळकतोय. फोटोतले दादाराव म्हणतात, गारपीटीमुळे सगळं संपलं होतं मात्र सरकारी मदतीमुळे पुन्हा उभं राहता आलं. वास्तवात दादाराव यांचा मुलगा गंगाराम जाधव काही वेगळच सांगतोय

दादाराव यांना तुटपुंजीच मदत मिळालीय. पण शासकीय जाहिरातीत मात्र सरकारी मदतीचं ते कौतुक करताना दिसत आहे. म्हणूनच आतागावकर्‍यांना काय जाब द्यावा या भीतीपोटी दादाराव अनरिचेबल झाले आहेत. दादाराव जाधव यांच्या बाजूलाच खेटून असलेल्या
शेतकर्‍यांचही गारपीटीत नुकसान झालंय. त्यांना मात्र शासकीय मदतीचा छदामही मिळाला नाही.

गारपीटग्रस्तांच्या मदतीची ही जाहिरात फसवी आहे, 60 लाख शेतकर्‍यांना 12 हजार कोटींची मदत दिल्याचा आकडाही बोगस असल्याचा दावा शेतकरी नेते जयाजी सुर्यवंशी यांनी केलाय.

गारपीटग्रस्त अनेक शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही हे वास्तव आहे. शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. अगदी शासकीय जाहिरातीमधील शेतकरीही गारपीटीच्या नुकसानीतून उभा राहिलेलाच नाही. पण सरकारच्या जाहिरातीतून मात्र काही वेगळंच चित्र दाखवलं जातंय. दरम्यान, गारपीटग्रस्तांना मदत देताना काही उणिवा राहिल्या असतील, तर सुधारणा करता येईल, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close