‘लय भारी’ शाळा, इथं फळा नव्हे थेट प्रोजेक्टरच !

August 9, 2014 10:16 PM0 commentsViews: 524

बालाजी निरफळ, उस्मानाबाद

09 ऑगस्ट : शिक्षणाच्या संदर्भातील शहर आणि गाव ही दरी मिटवण्याचे विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत. याचसाठी उस्मानाबादमध्ये ई-लर्निंगचा प्रकल्प राबवला जातोय. लोकसहभागातून सुरू झालेल्या हा ई लर्निंगचा प्रकल्प आज 33 शाळामंध्ये यशस्वी पद्धतीने राबवला जातोय. यासंदर्भातला हा खास रिपोर्ट…

प्रोजेक्टरद्वारे शिकवण्यात गर्क असलेले शिक्षक आणि उत्सुकतेने पाहणारी मुलं..हे चित्र कोणत्याही महानगरातल्या शाळेतलं किंवा
क्लासेसमधलं नसून परांडा तालुक्यातल्या आसू जिल्हा परिषदेच्या शाळेतलं आहे. हे आहे ई लर्निंग. इथे पुस्तकातून रटाळ वाटणारी माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून सांगितली जाते. नेहमीचा अभ्यासक्रम या नव्या रुपात शिकवल्या जाण्याच्या प्रयत्नामुळे विद्यार्थी खूश आहेत.

हा प्रकल्प लोकसहभागातून साकारलाय. सुरुवातीला एक लाख रुपये लोकवर्गणी गोळा केली. या वर्गणीतून प्रोजेक्टर आणि इतर गरजेचं साहित्य आणलं. कॉम्प्युटरच्या माध्यमातून तर पन्नास हजारांमध्येही हा प्रकल्प राबवता येऊ शकतो. या नव्या रुपड्यातल्या शिक्षणामुळे किमान 20 टक्के पटसंख्याही वाढल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे.

आज एकूण 33 शाळांमध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला जातोय. या यशस्वी प्रयोगानंतर आता या जिल्हापरिषदेच्या शाळांनी आय एस ओ मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेत. दुर्गम भाग म्हणून कायम मदतीची अपेक्षा बाळगण्यापेक्षा लोकांच्या आणि प्रशासनाच्या सक्रिय सहभागातून आधुनिक जगासोबत वाटचाल करता येते हेच या प्रकल्पातून अधोरेखित होतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close