इबोलाची धास्ती; चेन्नईत एका तरुणाची तपासणी

August 10, 2014 6:52 PM0 commentsViews: 4667

Ebola

10 ऑगस्ट : सध्या जगभर इबोला वायरसची भीती पसरली आहे. आफ्रिकेतल्या गिनियातून आलेल्या एका भारतीय व्यक्तीला सध्या चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाला इबोला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र रविवारी संध्याकाळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या रुग्णाला इबोलाची लागण झालेली नाही असे स्पष्ट केले आहे.

सरकारी निर्देशानुसार आफ्रिकेतील देशांमधून आलेल्या व्यक्तीची आधी इबोला चाचणी घेतली जात आहे. शनिवारी रात्री गिनियातून चेन्नई विमानतळावर आलेल्या 25 वर्षांच्या भारतीय तरुणाला डोकेदुखी व तापाचा त्रास जाणवत होता. अखेरीस रात्री उशिरा त्याला चेन्नईतील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इबोलाची लागण झाल्याचा संशय असल्याने त्या रुग्णाला दाखल करण्यात आलेला वॉर्ड रिकामा करण्यात आला. यानंतर त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

याविषयी माहिती देताना रुग्णालयातील डॉक्टर रघुनंदन म्हणाले, सध्या त्या तरुणाची प्रकृती उत्तम आहे. त्याला इबोलाची कुठलीही लक्षणं नाहीत याची खातरजमा करण्यासाठी काही चाचण्या घेतल्या जातील व त्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला जाईल. आफ्रिकेत इबोलाची साथ पसरल्याचे जाहीर केले असून यानंतर भारतातील सर्वच विमानतळांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close