ओवेसींचा एमआयएम महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीत

August 10, 2014 2:56 PM0 commentsViews: 1347

Ovesis

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद
महाराष्ट्रात आता सगळ्याच पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेत. राजकीय पक्ष आता आपापल्या युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपासाठी खडे मारून बघतायत. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. आधीच नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या एमआयएमनंही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उडी घेण्याचं ठरवलंय. एमआयएममुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं गणित बदलणार का, पाहूया याविषयीचा विशेष रिपोर्ट.

मुस्लीम समाजाचं नेतृत्व पहिल्यापासून वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरल्यानं त्यांच्यासाठी स्वतंत्र असं राजकीय व्यासपीठ नव्हतं. सर्वच राजकीय पक्षांनी आपला वापर केल्याची भावना झालेल्या मुस्लिमांना एमआयएमच्या रूपानं एक पर्याय दिसू लागला आहे. याचाच फायदा घेत आंध्र प्रदेशची सीमा ओलांडून मराठवाड्यात पाय रोवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे.

एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी संविधान पार्टीसोबत युती करून नांदेड महापालिकेत आपले अकरा नगरसेवक निवडून आणले. सिल्लोडमध्ये त्यांना यश मिळालं नसलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत दलित संघटनांची मोट बांधण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे.

असादुद्दीन आणि अकबरुद्दीन या भावांनी जहाल भाषणं करून कट्टरवादी मुस्लिमांना आपल्याकडे खेचण्यात काही प्रमाणात यश मिळवलं. पण मुस्लिमांमधला सामान्य मध्यमवर्ग आणि बुद्धिवादी वर्ग एमआयएमकडे आकर्षित झाला नाही.

ओवेसी बंधूंच्या जहाल भाषेमुळे मराठवाड्यात त्यांच्या सभांवर बंदी घातली जातेय. अशा स्थितीत विधानसभेच्या रणांगणात मराठवाड्यात हा पक्ष कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबत शंका आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close