सावरकरांनाही ‘भारतरत्न’ मिळावं – संजय राऊत

August 11, 2014 12:45 PM0 commentsViews: 1003

sanjay raut ob bharat ratna

11 ऑगस्ट :  ‘भारतरत्न’च्या घोषणेआधी आता या विषयावरून राजकारण सुरू झालं आहे. देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ यंदा पाच जणांना जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही भारतरत्न मिळालं तर चांगलं होईल, असं सूचक वक्तव्य केलं आहे. तर काँग्रेसने वाजपेयींच्या आधी भगतसिंग आणि राजगुरू यांना भारतरत्न द्यायला हवं, अशी मागणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला पाच पदके तयार करायला सांगितली आहेत.आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्यासह आणखीन दोन नावांची चर्चा आहे.

नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात नेहरू – गांधी घराण्यांवर जोरदार हल्ला चढविताना काँग्रेसला या घराण्यांच्या सन्मानाशिवाय काही दिसत नाही, अशा स्वरूपाची टीका केली होती. त्याचबरोबर जर एनडीए सत्तेत आली, तर देशातील इतर कर्तृत्ववान नेत्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्‍वासनही दिल होते. त्याचं पार्श्वभूमीवर अटल बिहारी वाजपेयी, कांशीराम यांच्यासह पाच जणांना भारतरत्न देण्याचा केंद्राचा विचार आहे. यात सुभाषचंद्र बोस यांचंही नाव असण्याची शक्यता आहे. मात्र बोस यांच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला आहे. आधी नेताजींच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकला, अशी त्यांनी मागणी केली आहे. 1945 मध्ये नेताजी बेपत्ता झाले असून, त्यांचा मृत्यू कधी झाला आणि त्यासाठीचे पुरावे कोठे आहेत, हे अगोदर सांगणे आवश्यक आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याविषयीच्या फाईली उघड करणे हाच त्यांचा मोठा सन्मान असल्याचे, नेताजींचा पणतू चंद्रकुमार बोस यांनी सांगितलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close