वरूण गांधींचा रासुका रद्द

May 8, 2009 5:58 PM0 commentsViews: 6

8 मे, पिलिभीत भाजप नेते वरूण गांधी यांच्यावरचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात रासुका हटवण्यात आला आहे. स्टेट ऍडव्हायजरी बोर्डानं हा निर्णय घेतला आहे. स्टेट ऍडव्हायझरी बोर्डाच्या निर्णयाविरोधात उत्तरप्रदेश सरकारने सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेश सरकार वरूण गांधी यांना सुप्रिम कोर्टात आव्हान देणार आहेत. वरूण गांधी यांच्या पिलिभीत मतदारसंघात 13 मेला मतदान होणार आहे. ते पाचव्या टप्प्यातलं मतदान असणार आहे. उत्तर प्रदेशच्या पिलिभीत मतदार संघात भाजपचे तरुण युवा उमेदवार आणि मनेका गांधीचे पुत्र वरूण गांधी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असं भाषण 6 मार्चला प्रचार सभेत केलं होतं. त्या दिवशी पिलिभीत मतदार संघात त्यांनी मुस्लिमांवर टीकेची झोड उठवली होती. सर्व हिंदूना एका बाजूला करून ' उरलेल्यांना ' पाकिस्तानात पाठवायला हवं, असे उद्गार काढल्याचा वरूण गांधी यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलिभीत जिल्हाधिका-यांनी कलम 153 – अ, 123 – अ आणि 123 – ब या कलमांखाली अजामीनपात्र गुन्हा आणि भाजपलाही नोटीस बजावली होती. वरूण गांधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सभेत वरूण गांधींनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वाचीही खिल्ली उडवली होती. कुणी एका गालावर थप्पड मारली तर पुढचा गाल पुढे करणं ही आपण ऐकलेली आजवरची सर्वात मूर्खपणाची गोष्ट आहे, अशी मुक्ताफळंही वरूण गांधी यांनी उधळली होती. प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वरूण गांधींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्याच काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. या टीकेचा समाचारही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'वरूण खरं बोलला, आम्हाला हा गांधी चालेल' या लेखात घेतला आहे. तसंच पक्षानं आपल्या एका नेत्याला असं वार्‍यावर सोडणं योग्य नसल्याचा टोला शिवसेनाप्रमुखांनी भाजपला होता. वरूण यांच्या वक्तव्यामुळे उत्तरप्रदेश सरकारनं त्यांच्यावर रासुका लावला होता.

close