वीरप्पा मोईली आणि अश्विनी कुमार यांची काँग्रेस प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी

May 9, 2009 9:44 AM0 commentsViews: 6

9 मेबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते वीरप्पा मोईली यांची काँग्रेस प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. मोईली काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुखही होते. या पदावरुनही त्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी मीडिया सेलचे प्रमुख म्हणून जनार्दन द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर प्रत्येक पक्षाला आपलं सरकार प्यारं आहे. बेपर्वाईने केलेल्या कोणत्याही विधानामुळे आपलं सरकार पडू शकतं याची खबरदारी सगळे पक्ष घेत आहेत. असं असतानाही काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि मीडिया सेलचे प्रमुख विरप्पा मोईली यांनी राहुल गांधींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार याचं कौतुक केल्याप्रकरणी नितीशकुमार यांच्यावर ताशेरे ओढले होते. नितीशकुमार जातीयवादी लोकांच्या विळख्यात अडकले असल्याचं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. मध्यंतरी श्रीलंकेतल्या तांमिळी जनतेच्या प्रकरणावरूनही द्रमुक सरकारविरूध्दही वीरप्पा मोईली यांनी खटकणारी विधानं केली होती. त्यामुळे काँग्रेस आणि द्रमुक यांच्यामधले संबंध ताणले गेले होते. काँगे्रसच्या अधिकृत बैठकीतही मोईली यांनी लालू आणि पासवान सोडून इतर सर्व आमचे मित्र पक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लालू आणि पासवान यांच्यासारखे इतर पक्षांचे नेतेही काँग्रेसपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाल्याची काँग्रेसमध्ये चर्चा होती .अशा प्रकारे मोईली यांनी वारंवार केलेली आक्षेपार्ह वक्तव्यं काँग्रेस हायकमांडला पटली नसून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते वीरप्पा मोईलींवर ही कारवाई केली असल्याचं समजतंय. दरम्यान एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते वीरप्पा मोईली कर्नाटकमध्ये निवडणूक लढवायला गेल्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अश्विनी कुमार मीडिया सेलचे प्रमुख म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत माहिती पुरवण्याची जबाबदारी सांभाळत होते. पण निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या भाजपच्या तुलनेत मीडियाला काँग्रेस पक्षाची अधिकृत माहिती पुरवण्यात सुसूत्रतेचा अभाव असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अश्विनी कुमार यांचीही पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. निवडणुकांचा निकाल जवळ येऊन ठेपला असताना 272 ची टार्गेट फिगर गाठण्यासाठी काँग्रेसला हाती असलेले मित्र पक्ष आणि होऊ पाहणारे संभाव्य मित्र पक्ष जपताना तारेवरची कसरत करावी लागतेय. अशा परिस्थितीत आपल्या पक्षाबद्दल बिनचूक विधानं करणा•या प्रवक्त्यांची गरज असल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. हा विचार करूनच राजकीय वर्तुळात काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करून मीडियातही काँग्रेसची प्रतिष्ठा कायम राखणं तसंच यूपीएला एकसंध ठेवणं महत्त्वाचं असल्यामुळे वीरप्पा मोईलींच्या जागी जनार्दन द्विवेदी यांसारख्या अनुभवी प्रवक्त्यांच्या हाती काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

close