पाकमध्ये थेट युद्ध करण्याची ताकद नाही – मोदी

August 12, 2014 1:18 PM0 commentsViews: 6099

Modi speech

12  ऑगस्ट :  पाकिस्तानने समोरासमोर युद्ध करण्याची ताकद गमावल्याने तो देश अतिरेक्यांच्या मदतीने छुपे युद्ध लढत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ही टीका करताना त्यांनी पाकिस्तानचं थेट नाव घेणं मात्र टाळत ‘शेजारचे राष्ट्र’ असा उल्लेख केला. युद्धापेक्षा दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यात भारतीय जवानांचे जास्त नुकसान होत आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौर्‍यावर असून या दौर्‍यात लेह इथे जवानांशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. दहशतवाद ही जागतिक समस्या असून जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी त्याविरोधात लढण्यासाठी एकवटलं पाहिजे. या मानवतावादी शक्तींचं सशक्तीकरण आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असंही मोदी म्हणाले. जवानांनी हे लक्षात ठेवावं की सर्व देश त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे. जवानांच्या परिवाराला खूप संघर्ष करावा लागतो, पण जवानांनी खंबीर रहावं, असं म्हणून मोदींनी जवानांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शहीद स्मारक उभारण्याचा पुनरुच्चारही केला.

लेह-लडाखच्या विकासासाठी मोदींनी दिला ‘3पी’ फॉर्म्युला

लेहमधल्या निमू बाजगो या जलविद्युत प्रकल्पाचं यावेळी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. एक काळ होता जेव्हा भारताचे पंतप्रधान 9-10 वर्षं काश्मीरला भेट द्यायचे नाहीत. पण ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एक महिन्याच्या आत मी दुसर्‍यांदा काश्मीरमध्ये येतोय, असंही मोदी म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ‘3पी’ची गरज असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकाश, पर्यावरण आणि पर्यटन या तीन क्षेत्रांचा विकास आवश्यक असल्याचं सांगितलं. लेह-लडाखमधील पर्यटन वाढवण्यावर आणि रोजगारनिर्मितीवर भर देणार, असंही मोदी म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close