औरंगाबादमध्ये 350 वर्षांपूर्वीच्या लायब्ररीत दुर्मिळ ग्रंथांचा खजिना

August 13, 2014 10:09 AM0 commentsViews: 1040

Aug library
सिध्दार्थ गोदाम; औरंगाबाद
13  ऑगस्ट :  औरंगाबाद शहराशी अनेक पुरातन आठवणी जडलेल्या आहेत. अजिंठा-वेरुळमुळे औरंगाबाद आणि देशाचं नाव जगाच्या पर्यटनात ठळक दिसतं. याच औरंगाबादमध्ये एक पुरातन खजिना सांभाळणारी प्राचीन लायब्ररी आहे. आशिया खंडातल्या अनेक जुन्या लायब्ररींपैकी एक असणारी ही लायब्ररी थोडीथोडकी नाही तर तब्बल 350 वर्षं जुनी आहे.

ऐतिहासिक औरंगाबादेतलं पाणचक्की हे प्रसिद्ध स्थळ. याच पाणचक्कीमध्ये एक ऐतिहासिक ठेवा जपला जातोय. इथे आशिया खंडातील सर्वात जुनी लायब्ररी नागरिकांसाठी खुली करण्यात आलीय. या लायब्ररीमध्ये 600 ते 700 वर्षं जुनी पुस्तकं आढळतात. अरबी, पर्शियन भाषेतील दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकं हे या लायब्ररीचं वैशिष्ट्य.

इस्लामी धर्माचे मौल्यवान ग्रंथ तर इथे आहेतच पण सगळ्यांत खास गोष्ट म्हणजे औरंगजेबानं हातानं लिहिलेलं कुराण इथे आहे. या कुराणला सोन्याचा मुलामा दिलेला आहे तसंच हजरत बाबा शाह मुसाफिर यांचीही हस्तलिखितं इथे आहेत.

हजरत बाबा शाह मुसाफिर यांची इराण, इराक, कतार, अफगाणिस्तान आणि इजिप्त देशातून आणलेल्या इस्लामी तत्वज्ञानावरच्या पुस्तकांचा खजिना इथे आहे. तसंच अरबी-उर्दू पार्शियन शब्दकोश, मौलाना मीर गुलाम अली यांची हस्तलिखितंही इथे आहेत. 17व्या शतकात हजरत बाबा शाह मुसाफिर यांनी पाणचक्की इथं गुरूकुल उभं केलं आणि विद्वान विद्यार्थी घडवले. त्याच विद्यार्थ्यांसाठीची ही लायब्ररी.

इतिहासाच्या समृद्ध वारशाची परंपरा सांगणार्‍या या लायब्ररीत अमूल्य असा ठेवा जपला जातोय, पण गरज आणि जबाबदारी आहे ती हा दुर्मिळ ठेवा असाच जपण्याची.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close