…तर स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी -ठाकरे

August 13, 2014 8:57 PM0 commentsViews: 1326

manikrao_thakare_onNCP13 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडीची चिन्हं दिसू लागली आहे. जागावाटपावरून होणारी वादावादी, विधान परिषदेत विनायक राऊत यांच्या रिकाम्या जागेसाठी दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार आणि नंतर माघार द्यायला दिलेला नकार, या सर्व घटनाक्रमांतून आज अखेर काँग्रेसने राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

जागावाटपाच्या वाटाघाटीत राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम असेल तर आमची 288 जागा एकट्याने लढवायची तयारी आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

विधान परिषदेची जागा काँग्रेसचीच आहे, ती आमच्याच वाट्याला यायला हवी अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी मांडली. मुख्यमंत्री इतर ज्येष्ठ नेत्यांशी बोलून चर्चा करतील आणि उद्या गुरुवारी सकाळी आम्ही निर्णय घेऊ असंही ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं.

मुंबईमध्ये आज (बुधवारी) संध्याकाळी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आज रात्री 9.30 च्या सुमारास सह्याद्रीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यादरम्यान बैठक होणार आहे. दोघेही विधानपरिषद निवडणुकीच्या वादावर चर्चा करणार आहेत. त्यावेळी काही तोडगा निघतो का ते बघावं लागेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close