मी देशाचा प्रधानमंत्री नाही तर प्रधानसेवक- मोदी

August 15, 2014 2:22 PM0 commentsViews: 1084

independence day bannersss copy

15 ऑगस्ट :  स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी बलिदान दिलं, त्यांना मी वंदन करतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या पहिल्या वहिल्या भाषणाची सुरूवात केली. आज भारताचा 68 वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी, तिन्ही दलांनी पंतप्रधानांना सलामी दिली.  पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आलं. कुठल्याही सुरक्षेशिवाय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. उस्त्फूर्त, तडफदार, भारतीयांना स्वप्नं दाखवणारं मोदींचं भाषण एक तासापेक्षा जास्त वेळ झालं. जवाहरलाल नेहरूंच्यानंतर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी सगळ्यात जास्त वेळ भाषण करण्याचा विक्रम आज नरेंद्र मोदींनी केला.

देश, नेत्यांनी किंवा सरकारांनी घडवला नाही तर शेतकर्‍यांनी घडवला आहे. हा देश मजुरांनी, शिक्षकांनी, समाजसेवकांनी, वैज्ञानिकांनी निर्माण केला आहे असं म्हणत पंतप्रधानांनी भारत देशाच्या विकासासाठी झटणार्‍या प्रत्येकाचे अभिनंदन केलं. हा देश इथे पोचलाय त्याला सर्व माजी सरकारांचं, सर्व पंतप्रधानांचं, राज्यांच्या सरकारांचं योगदान आहे त्यांचेही मी अभिनंदन करतो. मी आज प्रधानमत्रींच्या रुपाने नव्हे तर प्रधान सेवकाच्या रुपाने उभा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक पिढ्या झटल्या आहेत. त्यांना मी नमन करतो. गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते ही आपल्या घटनेची ताकद आहे. आपण एकत्र आलो तरच देश पुढे जाऊ शकतो. असं ते म्हणाले.

मी दिल्लीसाठी आऊट सायडर आहे. मी जेव्हा येथे आलो तेव्हा सरकारमध्ये आणि सरकारी यंत्रणांमध्ये गटबाजी दिसून आली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. सरकारमधील दोन यंत्रणा एकमेकांविरोधात लढताना दिसल्या. मी सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. सर्व सरकारी यंत्रणांना एकत्र घेऊन देशाला पुढे न्यायचे आहे. सरकारी अधिकारी वेळेवर कामावर पोहोचतात ही बातमी आहे का? पण जर ती बातमी बनत असेल तर आपण कुठल्या थराला गेलोय हे बघायला हवं असंही ते म्हणाले. दिल्ली बाहेरनं आलोय पण राष्ट्रकल्याणाची गती वाढवेन हा देशवासियांना विश्वास देऊ इच्छितो. तिरंग्याची शपथ घेऊन सांगतो हे शक्य आहे आणि ते होईल. स्वप्नातला भारत घडवण्याची आपली जबाबदारी आहे की नाही याचा विचार करण्याची वेळ आलीय असं ही ते म्हणाले.

मोदी म्हणाले, सगळ्या गोष्टी मी आणि माझ्यासाठी अशा नसतात. काही देशासाठीही असतात. देशाच्या विकासासाठी पुढे यायला हवे. हिंसेच्या मार्गाने काही मिळणार नाही. प्रत्येक माओवादी, दहशतवादी यांना आई – वडील असतात. जर मुलगा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचे काम त्यांचे आहे. हिंसेंच्या रस्त्यावरून परत येण्याचा रस्ता जर नेपाळ दाखवत असेल तर भारत का नाही. हिंसेचा रस्ता सोडा आणि बंधुभावानं वागा. शांती, एकता, सद्भावना, बंधुभाव आपल्याला पुढे न्यायला मदत करेल असं आवाहनही त्यांनी केला आहे. बलात्काराच्या बातम्या ऐकून माझी मान शर्मेने खाली जाते. स्त्रीभ्रुण हत्येवर बोलताना पंतप्रधानांनी स्त्रीभ्रुण हत्या करणार्‍या डॉक्टरांना सल्ला दिला आहे. स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी एका मातेच्या गर्भात वाढणार्‍या मुलीला मारू नका असं ते म्हणाले. मुलगा असला तरी आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात पण मुलगी आयुष्यभर आईवडिलांची सेवा करते. राष्ट्रकुल खेळांत 40 पैकी 29 पदकं मुलींची, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मुलांच्या आशेनं मुलींना बळी चढवू नका, असं आवाहन ही त्यांनी प्रत्येक आईला केलं आहे.

सरकारमध्ये येऊन पहिलं काम सफाईचं सुरू  केलं. आपला देश कधीही स्वच्छ होऊ शकतं नाही? सव्वाशे करोड देशवासियांनी संकल्प केला तर हे सहज शक्य असल्याचं ही त्यांनी सांगितलं. महात्मा गांधींनी भारत जगभरात पोहचवला. महात्मा गांधींच्या जयंतीला आपण स्वच्छ भारताची भेट देऊ .भारताच्या प्रत्येक शाळेत टॉयलेट असायलाच हवं. ‘सीएसआर’चा निधी शाळेत टॉयलेट बनवण्यासाठी वापरण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि मला हे काम आजपासूनच सुरू करायचं असंही त्यांनी सांगितलं.

डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवताना मोदींनी जगभरातल्या उद्योगांनी उत्पादनासाठी भारतात यावं असं आवाहन केलं. ‘कम, मेक इन इंडिया’ असे आवाहन करत जगभरात कुठेही विक्री करा, परंतु बनवा भारतातच असे सांगितलं आहे. प्लॅनिंग कमिशननं आपलं काम चांगलं केलं असलं तरी नियोजन आयोगाचं रूप पालटण्याची आणि अनेक बदल करण्याची गरज असल्याचं सांगत प्लॅनिंग कमिशन बरखास्त करत नवीन संस्था सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नियोजन आयोग रचना त्यावेळच्या परिस्थितीनुसार करण्यात आली होती. आतापर्यंतच्या कामाबद्दल अभिनंदन पण देशाला पुढे न्यायचं असेल तर राज्यांना पुढे नेलं पाहिजे असं ही ते म्हणाले.

प्रत्येक गरिबाचं बँक खाते असेल असे सांगत त्याला एक लाख रुपयाचा विमा मिळेल ही योजनाही मोदींनी जाहीर केली. त्यामुळे पुढचं बजेट गरिबांसाठी, बेरोजगारांसाठी आणि ग्रामीण भारतासाठी उत्साहवर्धक असेल अशी शक्यता आहे.

पहिलं बजेट युपीएच्या पावलावर पाऊल टाकणारं असलं तरी पुढील वर्षाचं भारताचं बजेट कसं असेल याची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दाखवली. कुठल्याही नेत्याच्या नावे योजना लागू न करता संसदेच्या नावानं आदर्श ग्राम योजना मोदींनी जाहीर केली असून प्रत्येक खासदारानं सुरुवातीला एका गावात आणि 2019 पर्यंत पाच गावांमध्ये आदर्श ग्राम योजना राबवावी असं सांगितले. हे गाव कसं असेल याची ब्ल्यू प्रिंट 11 ऑक्टोबर या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मतिथीच्या दिवशी सगळ्या खासदारांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं. सगळ्या राज्यांनी आमदारांच्या सहाय्यानं अशाच प्रकारचा उपक्रम हाती घ्यावा असेही त्यांनी सुचवले. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये हजारो गावांना आदर्श ग्राम करण्याची योजना मोदींच्या डोक्यात असून बजेटमध्ये त्याचे प्रतिबिंब पडेल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले ठळक मुद्दे:

 • ‘लवकरच नियोजन आयोगाच्या जागी नवीन संस्था स्थापणार’
 • ‘नियोजन आयोगाचं रूप पालटण्याची गरज’
 • ’11 ऑक्टोबरला खासदार ग्राम योजनेची ब्लू प्रिंट सादर करणार’
 • ‘प्रत्येक खासदाराने किमान 5 आदर्श गावं घडवावीत’
 • ‘CSR मधून शाळांमध्ये कंपन्यांनी शौचालयं बांधावीत’
 • खासदार आदर्श ग्राम योजनेची घोषणा
 • ‘प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी वेगळी शौचालयं असावीत’
 • देशभरात शौचालयं उभारणं गरजेचं – पंतप्रधान मोदी
 • महिलांना सन्मान देणं आपलं कर्तव्य – पंतप्रधान मोदी
 • डिजिटल इंडिया जगाची बरोबरी करू शकतो
 • ई गर्व्हनन्सच्या मार्फत सुशासन आणणार
 • ‘लवकरच नियोजन आयोगाच्या जागी नवीन संस्था स्थापणार’
 • माझ्या देशाला कोणतीही गोष्ट आयात करावी लागू नये – पंतप्रधान मोदी
 • भारत जगभरात निर्यात करणारा देश बनू शकतो – पंतप्रधान मोदी
 • भारत जगभरात निर्यात करणारा देश बनू शकतो
 • ‘मेड इन इंडिया’चा नारा जगभरात पोहोचावा
 • भारतात उत्पादन करण्याचं मोदींचं आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आवाहन
 • प्रत्येक अकाऊंटसोबत डेबिट कार्ड आणि विमा मिळणार
 • प्रत्येक गरीब कुटुंबाला 1 लाखाचा विमा मिळणार
 • डिजिटल इंडिया जगाची बरोबरी करू शकतो
 • ‘जन धन’ योजनेची घोषणा
 • ‘आपल्या तिजोर्‍या भरण्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या करू नका’
 • मुलगी आयुष्यभर आई-वडिलांची सेवा करते – पंतप्रधान मोदी
 • ‘मातेच्या गर्भात वाढणार्‍या मुलीला मारू नका’
 • ‘देशात शांती, समृद्धी, सद्भाव, बंधुभाव नांदू शकेल’
 • ‘राष्ट्रकल्याणाची गती वाढवेन याचा मला विश्वास आहे’
 • ‘स्वप्नातला भारत घडवण्याची जबाबदारी आपली आहे’
 • हिंसेचा रस्ता सोडा आणि बंधुभावाने वागा
 • आपला मुलगा कुठे जातो हे विचारायला हवं
 • आपलं रक्षण करणार्‍या जवानांना वंदन
 • ‘मी पंतप्रधान म्हणून नाही, तर प्रधान सेवक म्हणून आलोय’

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close