नियोजन आयोगाची फेररचना; मराठी माणसाकडे धुरा?

August 15, 2014 2:15 PM0 commentsViews: 1064

modi3

15 ऑगस्ट :   केंद्रीय नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या आपल्या भाषणात जाहीर केलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकास योजनांमध्ये सुसूत्रता असावी या विचारातून नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. देशाच्या वार्षिक आणि पंचवार्षिक योजना बनवणे हे नियोजन आयोगाचे प्रमुख काम होते.

बजेटसाठी आकडेवारी पुरवणे, राज्य सरकारांचे वार्षिक प्रकल्प मंजूर करणे, अशी अनेक आयोगाची प्रमुख कामं होती. पण काळाच्या ओघात अर्थव्यवस्थेची दिशा बदलली आणि सरकारच्या नियोजन आयोगाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या गरजांचा विचार करून देशाची पावलं पडणं गरजेचं आहे. सध्याच्या ढाच्यामध्ये नियोजन आयोगाकडून हे काम होताना दिसत नाही. त्यामुळे आयोगामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं होतं. मोदींनी याची घोषणा करून एका ऐतिहासिक बदलाची सुरुवात केली आहे.

दरम्यान, या आयोगाची धुरा एका मराठी माणसाकडे सोपवली जाईल अशी चर्चा दिल्लीत रंगली आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे या नव्या नियोजन आयोगाचा कारभार पाहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुरेश प्रभू यांनी या आधी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ऊर्जा आणि पर्यावरण या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. शिवाय एनडीए सरकारच्या काळात झालेल्या उर्जा स्रोतांच्या सुधारणांचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं. सुरेश प्रभू हे आधुनिक तंत्राचा वापर करून सुधारणा करण्याबद्दलच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक मोठ्या प्रकल्पांचे ते सल्लागार आहेत. नदी जोड प्रकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close