स्वातंत्र्यदिनाला आंदोलनांचं गालबोट, शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 15, 2014 5:11 PM0 commentsViews: 1052

andolan15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे पण राज्यात शासकीय कार्यक्रमाला राज्यात ठिकठिकाणी निदर्शनांचं गालबोट लागलंय. सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, विदर्भात निदर्शकांनी घोषणाबाजी आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुंबईत मंत्रालयासमोर आज मागासवर्गीय औद्योगिक संघटनेनं निदर्शनं केली. यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली. कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये या पाच कार्यकर्त्यांना नेण्यात आलं आहे.

नाशिकमध्ये शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

तर नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तहसीलदार कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा सोहळा होत असताना या शेतकर्‍यांनी आंदोलन केलं. गारपीटीची नुकसानभरपाई मिळाली नसल्याची त्यांनी तक्रार केलीय. पोलिसांनी या 5 शेतकर्‍यांना ताब्यात घेतलंय. राज्यावर दुष्काळाचं सावट असताना, सगळ्यांनी एकत्रितपणे त्याचा सामना करण्याचं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. पालकमंत्री या नात्यानं भुजबळ यांनी विभागीय आयुक्तालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केलं. त्यावेळी ते बोलत होते.

जळगावात आदिवासी कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातही पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आदिवासी वाल्मिक एकलव्य संघटनेचे हे कार्यकर्ते आहेत. अनुसूचित जातींना दाखले मिळण्यात होणारा विलंब टाळावा, आदिवासी कल्याण समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी अशा त्यांच्या मागण्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय आहे.

सिंधुदुर्गात मुंडण

गेल्या तीन दिवसांपासून सुरू आसलेल्या सिंधुदुर्गातल्या ठाकर समाजाच्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे शासनाचा निषेध म्हणून आजच्या स्वातंत्र्यदिनादिवशी या समाजाच्या 65 हून अधिक जणांनी मुंडण करुन घेतलं. ठाकर समाजाचा आदिवासी श्रेणीमध्ये समावेश असूनही या समाजाला जात वैधता प्रमाणपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकर्‍यांना मुकावं लागलंय. तर कित्येक जणांची नोकरी अद्यापही अस्थायीच आहे. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नारायण राणे यांनी आज अखेर या आंदोलकांची भेट घेत या समस्येवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.

वेगळ्या विदर्भाची मागणी

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात निदर्शनं केली. विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांच्यासमोर ही निदर्शनं करण्यात आली, या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं.
तर विदर्भात आज स्वातंत्र्यदिनादिवशी वेगळ्या विदर्भाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ही मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपल्या मागणीसाठी निदर्शनं केली. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते ध्वजावंदन झाल्या. विदर्भवाद्यांनी मोघे यांना विदर्भाच्या मागणीबाबत बोला अशी ओरड केली. याप्रकरणी पोलिसांनी झाकीर शेख या विदर्भवादी कार्यकर्त्याला ताब्यात घेतलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close