फिल्म रिव्ह्यु : सिंघम रिटर्न्स ‘फक्त बाजीराव सिंघम’

August 15, 2014 10:13 PM0 commentsViews: 8006

अमोल परचुरे, समीक्षक

सिंघम रिटर्न्स… रोहित शेट्टी आणि अजय देवगण या जोडीने सिंघममध्ये धमाल उडवून दिली होती. रोहित शेट्टी स्टाईल इमोशन्स आणि खणखणीत स्क्रीनप्लेमुळे टिपिकल ऍक्शन फिल्मपेक्षा सिंघम वेगळा ठरला होता. सर्वच कलाकारांच्या सणसणीत अभिनयामुळे एक जबरदस्त फिल्म बघायचा आनंद प्रेक्षकांना मिळाला. आता त्याच पुण्याईच्या जोरावर सिंघम पुन्हा एकदा भेटीला आला आहे.

singham25बाजीराव सिंघम हे कॅरेक्टर तसंच ठेवून बाकी सगळी स्टोरी आणि व्यक्तिरेखा बदलून नवी मसालेदार कथा सादर करण्याचा प्रयत्न रोहित शेट्टीने केलेलेला आहे, पण जी मजा सिंघममध्ये होती ती सिंघम रिटर्न्समध्ये जाणवली नाही असंच दुदैर्वाने म्हणावं लागेल. याचं कारण कमजोर कथा आहे, त्याचबरोबर सिंघमसारखा पॉवरफुल व्हीलन यामध्ये नाही हेसुद्धा एक कारण आहे. हिरोला लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखेत सादर करताना व्हीलनही तेवढाच तगडा असायला लागतो. पहिल्या सिंघममध्ये ही गरज प्रकाशराजने व्यवस्थित पूर्ण केली होती. दुसर्‍या सिंघममध्ये मात्र अमोल गुप्ते आणि झाकीर हुसैन यांच्या व्यक्तिरेखेत तोचतोचपणा आहे. बोगस बाबा आणि भ्रष्ट राजकारणी असा व्हीलनचा चेहरा अनेक सिनेमांमध्ये येऊन गेलेला, त्यामुळे त्यात फार दम वाटत नाही.

काय आहे स्टोरी ?

5singhamreturns2यावेळेस बाजीराव सिंघमचा सामना आहे काळा पैसा आणि श्रध्देच्या नावाखाली लोकांना लुबाडणार्‍या ढोंगी बाबाशी..सत्तेसाठी भ्रष्ट आणि ढोंगीपणाची युती बाजीराव सिंघमला मोडून काढायची आहे. सिनेमात सुरुवातीला बाजीराव सिंघम हा कसा सरळमार्गी पोलीस आहे हे ठसवण्यावर बराच वेळ घेतलाय. खलनायकाबरोबर आमने-सामने येण्यात बराच उशीर झालाय. तेवढ्या वेळात सध्याच्या राजकारणाशी मिळते-जुळते असे संदर्भ पेरण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नायिका आणि नायकाची पहिली भेट, मग थोड्या गमती-जमती असा एक वेगळा ट्रॅक आहेच. हे सगळं होऊन प्रत्यक्ष कथेला सुरुवात व्हायला आणि बाजीराव सिंघमची सटकायला इंटरव्हलची वाट बघावी लागते.
कथेमध्ये जोश आहे, नायकाची धडाडी आहे, टाळीबाज संवाद आहेत, तुफान ऍक्शन आहे पण सगळं असूनही काहीच मनाला भिडत नाही असा सगळा प्रकार आहे.

मराठी टच

3453singham2मी आधी म्हटल्याप्रमाणे हा अर्धा मराठी सिनेमा आहे. समीर धर्माधिकारी, स्मिता तांबे, गणेश यादव, अमोल गुप्ते, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, उदय टिकेकर, शुभांगी लाटकर, महेश मांजरेकर हे ओळखीचे मराठी चेहरे यामध्ये आहेतच, याशिवायही छोट्याछोट्या भूमिकांमध्ये मराठी चेहरेच दिसतात. त्यात अजय देवगण आणि करिना कपूर मध्येमध्ये मराठीत बोलतात, त्यामुळे आपण मराठी सिनेमाच बघतोय की काय असं वाटत राहतं. मराठी प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच सुखावून जाईल पण त्यापलीकडे एक उत्तम सिनेमा बघितल्याचं समाधान काही लाभणार नाही.

परफॉर्मन्स

रोहित शेट्टीने काही नवीन स्टंट यामध्ये सादर केलेत, पण स्टंटपेक्षा गोळीबार खूप जास्त आहे. अचूक नेम असलेला अजय देवगण अर्थातच या गोळीबारात नेहमी बाजी मारतो, हे वेगळं सांगायला नकोच.पण गोळीबाराचा जरा अतिरेकच झालाय. मुंबई शहराचं विहंगम रुप ही सिनेमाची एक जमेची बाजू म्हणायला हवी. एरियल शॉट्समुळे सिनेमा भव्य दिसतो, आकर्षक वाटतो पण कथेत दम नसल्यामुळे या इतर तांत्रिक गोष्टी कितीही चकचकीत असल्या तरी प्रभावहीन ठरतात. 4singham-2

अजय देवगणने आपल्या नेहमीच्या जबरदस्त स्टाईलमध्ये बाजीराव सिंघम साकारलाय. करिना कपूरच्या कॅरेक्टरला थोडा जास्तच भाव दिलाय असं वाटत राहतं. नायिका म्हणून तिची सिनेमात कामगिरी काहीच नाहीये, करिनाने अभिनय चांगला केला असला तरी तिच्या भूमिकेची काय गरज होती असाच प्रश्न पडतो. बाकी शरत सक्सेना, अनुपम खेर, महेश मांजरेकर या सर्वच अनुभवी कलाकारांनी आपापली कामं उत्तम केलेली आहेत पण लिखाणातच दम नसल्यामुळे सिंघम रिटर्न्स पॉवरफुल झालेला नाही. जबरदस्त ऍक्शनचे फॅन्स असाल तरच हा सिनेमा तुम्हाला आवडू शकतो.

रेटिंग 100 पैकी 50
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close