मोदींचा पलटवार, मुख्यमंत्र्यांना ‘जोर का झटका धीरे से’

August 16, 2014 6:30 PM0 commentsViews: 12228

pm on cm16 ऑगस्ट : भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विकासकामांच्या
निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे दोन कट्टर विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची जुगलबंदी पाहण्यास मिळाली. महाराष्ट्र नंबर वनच आहे असा टोला लगावून मुख्यमंत्र्यांनी मोदींना छेडले. पण राष्ट्रीय राजकारणात मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी झेप घेणारे नरेंद्र मोदी यांनीही आपल्या स्टाईलने सोलापूर इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना चांगलीच ‘शॉक ट्रिटमेंट’ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्र दौर्‍यावर आले होते. आज सकाळी मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाता या युद्धनौकाचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यानंतर उरणच्या जेएनपीटीला जोडणार्‍या एका महामार्गाच्या कोनशिलेचं अनावरण आणि सेझ प्रकल्पाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोदींना टोला लगावला. मोदीजी, महाराष्ट्र आज औद्योगिक, गुंतवणूक, रोजगार, उत्पादन या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे असा दावा चव्हाणांनी केला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हेएकाच व्यासपीठावर उपस्थितीत होते. तसंच आम्ही आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत खास करुन मुंबईला आधुनिक दर्जा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी तुमची आणि केंद्रीय मंत्र्यांची आम्हाला साथ हवी आहे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमात मोदींना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर मात्र महाराष्ट्र दौर्‍याचा अखेरचा कार्यक्रम सोलापुरात पार पडला.

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती

पुणे-सोलापूर रस्त्याच्या चौपदरीकरण आणि रायचून ट्रान्शमिशन लाईनचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी मोदींच्या अगोदर मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. यावेळी राज्याला वीजनिर्मितीसाठी योग्य प्रमाणात कोळसा आणि गॅस मिळावा अशी विनंती मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे केली. तसंच रखडलेले प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावावे अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचं भाषण जेव्हा सुरू होते तेव्हा सोलापुरकरांनी मोदींचा जयघोष करुन आसमंत दणाणून सोडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण थोडक्यात आटोपत घ्यावं लागलं.

मोदींकडून ‘शॉक ट्रिटमेंट’

यानंतर मोदी भाषणला उभे राहिले. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापूरमध्ये आलो होतो तेव्हा लोकांनी भरभरून प्रेम दिलं ते अजूनही कायम आहे या प्रेमाची परतफेड विकास कामातून देईन अशी ग्वाही मोदींनी दिली. त्यानंतर मोदींनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळवला. मुख्यमंत्री चव्हाण म्हणतात, वीजनिर्मितीसाठी केंद्राकडून पुरेसा मदत मिळाली पाहिजे. कोळसा आणि गॅस मिळावा, पण मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तर मी हेही बोलू शकत नव्हतो. दोन वर्ष मी अशीच वाट पाहिली असं सांगत मोदींनी मुख्यमंत्र्यांना निरुत्तर केलं.

वीज बचत करा, मोदींचं आवाहन

गरीब माणसाच्या झोपडीत दिवा असावा, गावांमध्ये 24 तास वीज असावी हे सरकारचं स्वप्न आहे, पण यासाठी आमच्यासोबत जनतेनंही पुढाकार घ्यावा, सर्वांनी आवश्यकता नसल्यावर वीजबचत करावी असं आवाहनही मोदी केलं. वीजबचतीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरात वीजबचतीचा संकल्प करावा असंही मोदी म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close