नात गतीमंद होती म्हणून आजीने घोटला गळा !

August 16, 2014 7:42 PM0 commentsViews: 1837

badlapur16 ऑगस्ट : आपली नात गतीमंद असल्याचा राग उराशी बाळगून एका आजीने आपल्याच अडीच वर्षाच्या नातीचा गळा घोटल्याची खळबळजनक घटना बदलापूरमध्ये घडलीय. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी या चिमुरडीचं अपहरण झालं असा बनाव रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच नात्याला काळिमा फासणारा हा प्रकार उजेडात आला.

बदलापूरमध्ये शुक्रवारी केतकी हिरे या अडीच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. केतकी आपल्याजवळ असताना एका रिक्षातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिला खेचून नेलं असं केतकीची आजी मंगला बोरसे हिने सांगितलं.

पण दोन दिवसांनंतर या मुलीचा कात्रपच्या गणेश घाट परिसरातील ओढ्यात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी आजीबाईंची कसून चौकशी केली असता घडलेला प्रकार समोर आला.

आपल्या अडीच वर्षाच्या नातीच्या अपहरणाचे नाट्य मंगला बोरसे या तिच्याच आजीने रचलं होतं. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह गणेश घाट परिसरातील ओढ्यात फेकून दिलं. केतकी ही गतीमंद असल्याने आजूबाजूचे लोक वारंवार तिच्या बाबतीत आजीकडे विचारणा करीत असत, शिवाय तिचे आई वडील हे कामाला असल्याने तिचा सगळा सांभाळ आजीला करावा लागत असल्याने तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. . दरम्यान या संबंधीची कबुली आजीने दिली असून तिला बदलापूर पोलिसांनी 302 कलमाखाली अटक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close