गोविलकर आणि बावधनकर यांनी दिली कसाब विरोधात साक्ष

May 12, 2009 5:08 PM0 commentsViews: 2

12 मे, मुंबई मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कदम यांच्या साक्षीनंतर आज डी.बी.मार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर आणि पोलीस सबन्स्पेक्टर हेमंत बावधनकर यांची साक्ष नोंदवण्यात आली. या दोघांनीही कसाबला ओळखलं. डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनचे एपीआय संजय गोविलकर यांनी कसाबचे कपडे तसंच कसाबनं वापरलेली एके- 47 देखील ओळखली. गिरगाव चौपाटीवर कसाब आणि अबू ईस्माइलशी लढणार्‍या एकाही पोलिस ऑफिसरकडे हत्यारं नव्हती असं गोविलकर यांनी कोर्टात सांगितलं. आपण जखमी झाल्यानंतरही कसाबची एके 47 रायफल त्याच्याकडून हिसकावून घेतल्याचं गोविलकर म्हणाले. संजय गोविलकर कसाबच्या गोळीनं जखमी झाले होते. याचप्रकरणात तिसरा साक्षीदार म्हणून पोलिस इन्स्पेक्टर हेमंत बावधनकर यांची साक्ष नोंदवण्यात आली. बावधनकर यांनीही कसाबला ओळखलं. कसाब आणि अबू ईस्माइलनं वापरलेल्या एके 47 रायफल्स तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले हॅन्डगे्रनेड्सदेखील बावधनकर यांनी ओळखले. बावधनकर यांनी कसाब आणि अबू ईस्माइल यांचे कपडेदेखील कोर्टात ओळखले. अजमल कसाबनं आपल्याला तुरुंगात वर्तमानपत्र मिळावं यासाठी केलेला अर्जदेखील कोर्टानं फेटाळला. कोणत्याही कैद्याला कोर्ट सरकरी खर्चातून वर्तमानपत्र उपलब्ध करून देणार नाही असं उत्तर कोर्टानं कसाबला दिलं. तसेच कसाबचं कोर्टात कारण नसताना हसत रहाणं योग्य नाही असं कोर्टानं म्हटलंय. यापुढे योग्य कारणाशिवाय कसाब कोर्टात हसत राहिला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आज पुन्हा एकदा कोर्टाने कसाबला दिला. कसाब निर्दोष असल्याचा दावा कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी केला आहे. तसंच, काल कोर्टानं कसाबला सुनावणीदरम्यान हसल्याबद्दल फटकारलं होतं. त्याविषयी पत्रकारांनी काझमींना छेडलं. पत्रकारांनी कसाब तुकाराम ओंबळे आणि फायरिंग असं नाव निघताच का हसतो, असं त्याचे वकील अब्बास काझमी यांना विचारलं असता त्यांनी मीडियाच्या अंगावर खापर फोडलं. ' त्याला मीडियावाले हसवतात म्हणून तो हसतो, असं अब्बास काझमी म्हणाले. कोर्टानेही हे निरीक्षण नोंदवल्याचं काझमी यांनी सांगितलं.

close