‘नियोजन आयोगाऐवजी नव्या संस्थेसाठी तुमच्या कल्पना पाठवा’

August 19, 2014 11:56 AM0 commentsViews: 993

modi on lalkilla
19 ऑगस्ट :  केंद्रीय नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या आपल्या भाषणात जाहीर केलं होतं. आता त्याची अंमलबजावणी करत भाजप सरकारचा लोक सहभागाचा प्रयत्न आहे आणि यासाठी नरेंद्र मोदींनी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

नवा नियोजन आयोग कसा असावा, त्यामध्ये कोण कोणत्या गोष्टीचा समावेश असावा यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकांकडून सूचना आणि कल्पना मागवल्या आहेत. त्यासाठी पंतप्रधानांनी एक नवा ओपन फोरम तयार केला आहे जिथे सर्व सामान्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद सादता येणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या सूचना, कल्पना आणि समस्यांचा विचार करूनच नव्या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवरून आवाहन केलं आहे. www.mygov.nic.in या वेबसाईटवर लॉगईन करून आपण आपल्या कल्पना आणि सूचना मांडू शकणार आहे. कोणत्याही प्रकारच्या सूचना आणि कल्पना किंवा कोणतीही समास्या तुम्ही या वेबसाईटवर मांडू शकता, असं केंद्रातर्फे सांगण्यात आलं आहे. मोदींनी याची घोषणा करून एका ऐतिहासिक बदलाची सुरुवात केली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकास योजनांमध्ये सुसूत्रता असावी या विचारातून नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. देशाच्या वार्षिक आणि पंचवार्षिक योजना बनवणे हे नियोजन आयोगाचे प्रमुख काम होते. बजेटसाठी आकडेवारी पुरवणे, राज्य सरकारांचे वार्षिक प्रकल्प मंजूर करणे, अशी अनेक आयोगाची प्रमुख कामं होती. पण काळाच्या ओघात अर्थव्यवस्थेची दिशा बदलली आणि सरकारच्या नियोजन आयोगाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या गरजांचा विचार करून देशाची पावलं पडणं गरजेचं आहे. सध्याच्या व्यवस्थेत नियोजन आयोगाकडून हे काम होताना दिसत नाही. त्यामुळे आयोगामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं होतं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपण थेट जनतेशी संवाद साधून त्यांच निवारण करू असं आश्वासन दिलं होतं आणि ते वेवेगळ्या माध्यमातून पूर्ण करतानाही दिसत आहेत.

मोदींच ट्विट
– नियोजन आयोगाऐवजी नवी संस्था स्थापन करण्यासाठी तुमच्या कल्पना पाठवा
– नव्या संस्थेविषयी तुमच्या सूचनांसाठी माय गव्हर्मेंटवर नवं फोरम सुरू करण्यात आलंय
– तेव्हा कल्पनांचं स्वागत आहे www.mygov.nic.in

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘नियोजन आयोग गुंडाळण्याचा निर्णय देशासाठी हानीकारक असून आर्थिक बाबी मुक्त अर्थव्यवस्थेच्या हातात देणं धोकादायक’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close