योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचं निधन

August 20, 2014 8:40 AM0 commentsViews: 552

iyanger new
20  ऑगस्ट : योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचं आज पहाटे साडे तीन वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, ते 96 वर्षांचे होते. योगातील मौल्यवान योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते. योगगुरू अशी त्यांची जगभरात ओळख होती. अय्यंगार यांनी योगा हा सामान्य माणसापर्यंत नेला. आज अय्यंगार यांच्या संस्था जगभरात पसरल्या आहेत. आज दुपारी एक वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. यासाठी मंगळवारी त्यांना पुण्यातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने अय्यंगार योग परिवारावर शोककळा पसरली आहे.

बेल्लूर कृष्णम्माचार सुंदरराजा अय्यंगार असं त्यांचं संपूर्ण नाव होतं. कर्नाटकातल्या बेळ्ळूर गावात 14 डिसेंबर 1918 रोजी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या 16 व्या वर्षी बी.के.एस अय्यंगार यांचा पहिल्यांदा योगसाधनेशी संबंध आला आणि 18 व्या वर्षी ते योगसाधनेसाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर अय्यंगार यांनी योगक्षेत्रात मोलाचे योगदान दिले. जे.कृष्णमूर्ती, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन अशा दिग्गज्जांना त्यांनी योगसाधनेचे धडे दिले. योगाचार्य अय्यंगार यांनी भारतातच नाही तर जगभरात योगसाधनेची खरी ओळख निर्माण करून दिली. 26 जानेवारी 1973 रोजी अय्यंगार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने पुण्यात राममणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल पोप पॉल सहावे यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं.

दरम्यान, योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. उत्तम योगाचार्य, कुशल शिक्षक आणि योगामुळे जगभरात अनेकांच्या आयुष्यात बदल घडवणारे गुरू म्हणून अय्यंगार अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील. अय्यंगारांच्या जगभरातल्या शिष्यांच्या शोकात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close