डॉ.दाभोलकरांच्या खुनाला 1 वर्ष, मारेकरी अजूनही मोकाट!

August 20, 2014 11:05 AM0 commentsViews: 413

अद्वैत मेहता, पुणे
20 ऑगस्ट :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 1 वर्ष पूर्ण झालं. वर्ष उलटूनही दाभोलकरांचा खून आज एक गूढचं आहे. 20 ऑगस्ट 2013… रक्षाबंधनाचा दिवस… पुण्यामध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोळ्या झाडण्यात आल्या… ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर मोटरसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांच्या या गोळीबारात डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. मग नंतर या खुनाचे पडसाद देशभरात उमटू लागले. पुण्यात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.

दाभोलकरांच्या खुन्याबद्दल माहिती देणार्‍याला मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं पण पुणे पोलिसांना ना हल्लेखोरांच्या बाईकचा पूर्ण नंबर मिळाला, ना हल्लेखोरांचं सुस्पष्ट CCTV फुटेज. तपास यंत्रणांना, ना खुनामागचा उद्देश सापडला, ना या कटाचे सूत्रधार सापडले. सतीश शेट्टी प्रकरणाप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येचाही क्लोजर रिपोर्ट CBI सादर करणार नाही ना अशी भीती तपासातल्या फोलपणामुळे व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षभरातल्या घटनाक्रमावर नजर टाकूयात

  • 20 ऑगस्ट – डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा पुण्यात भरदिवसा खून. हल्लेखोरांची माहिती देणार्‍यास राज्य सरकारकडून 10 लाखांचं बक्षीस जाहीर.
  • 21 ऑगस्ट – हत्येच्या निषेधार्थ पुण्यात बंद. तपासाला सुरुवात. संशयितांचं रेखाचित्र जारी
  • 28 नोव्हेंबर – नागोरी टोळीला अटक
  • 18 जानेवारी – गृहमंत्री आर.आर. पाटलांकडून पुणे पोलिसांना तपासासाठी एक आठवड्याची मुदत
  • 20 जानेवारी – मनीष नागोरी आणि विकास खंडेलवालला दाभोलकर हत्या प्रकरणात अटक
  • 4 एप्रिल – तपासासाठी राज्य सरकारकडून SITची स्थापना
  • 9 मे – तपास CBIकडे
  • 3 जून – CBIनं तपासाची सूत्रं हाती घेतली
  • 14 जुलै – मारेकर्‍यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याचा खळबळजनक खुलासा

डॉ. दाभोलकरांनी घेतलेला वसा वेगवेगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणत सुरू ठेवला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे, उपक्रमांद्वारे त्यांचं स्मरण केलं जातं. पण डॉक्टरांचे खुनी कोण, ते कधी सापडणार, या कटाचा पर्दाफाश कधी होणार, हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close