उद्धव ठाकरेंनी दिले मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत

August 20, 2014 4:59 PM0 commentsViews: 2556

23udhav_on_police_bharti20 ऑगस्ट : विधानसभा निवडणुका जशा जशाजवळ येऊ लागल्या आहेत तसे तसे राजकीय पक्षांचे रंग बदलत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. पण आता उद्धव यांनी पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्रीपदाच्या
शर्यतीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मी महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य बनवेन असं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट केलंय. नाशिकमधल्या घोटी इथं झालेल्या कार्यक्रमात उद्धव बोलत होते. या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण येवल्यातही प्रचार करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. या कार्यक्रमात उद्धवनी पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादाचं समर्थन केलंय. मी कट्टर हिंदुत्त्ववादी आहे, हिंदुस्थान हे हिंदूंचं राष्ट्र असल्याचंही उद्धव म्हणाले.

तसंच डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तपासयंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप उद्धवनी केलाय. हिंदुत्त्वावादी शक्तींवर संशय घेत मुख्यमंत्र्यांनी तपासाची दिशाभूल केली, जो कुणीही आरोपी असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणीही उद्धव यांनी केली. विशेष म्हणजे या काही दिवसांपूर्वी उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीरपणे कबुली दिली होती. आपण मुख्यमंत्री व्हावं ही शिवसैनिकांची इच्छा आहे असं उद्धव म्हणाले होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close