मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं लोण

August 21, 2014 2:05 PM0 commentsViews: 392

farmer suicide

21 ऑगस्ट :  विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं लोण आता मराठवाडा आणि सधन अशा उत्तर महाराष्ट्रातही पसरलं आहे.पावसानं दडी मारल्यानं एकट्या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात तर अहमदनगरमध्ये एका शेतकर्‍याची आत्महत्या केली आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात 4 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाडयात मान्सूननंतर आतापर्यंत एकूण 14 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या आठवड्याभरात 9 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. या सर्व शेतकर्‍यांनी दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त भागात मदत जाहीर केली आहे. पण ही मदत शेतकर्‍यांपर्यंत कधी पोहोचणार? हा खरा सवाल आहे.

अमळनेर तालुक्यात तर सलग दुसर्‍या दिवशी शेतकरी आत्महत्या झाली आहे. या शेतकर्‍याने कापसाचं बियाणं पेरलं होतं. मात्र, पाण्याआभावी ते उगवलंच नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोरडवाहू तालुक्यांमध्येही शेतकर्‍यांची मनस्थिती अत्यंत बिकट आहे. कर्जत तालुक्यातल्या रावसाहेब बनकर या शेतकर्‍यानं तर कोरड्या विहीरीत उडी टाकून आपला जीव संपवलाय. कर्जतमधल्या मिरजगावमधली ही घटना आहे.

गेल्या चार वर्षांपासून पाण्याआभावी त्यांची शेती तोट्यात होती. वीजेची थकबाकी असल्यानं वीज कंपनीनं जोडणी कापली होती. कर्जाच्या थकबाकीसाठी पतसंस्थेनं तगादा लावला होता. अखेर त्यांनी आपलं आयुष्यच संपवलं. मराठवाड्यातही परिस्थिती वेगळी नाही. मराठवाड्यात मान्सूननंतर आतापर्यंत एकूण 14 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे. तर गेल्या आठवडाभरात 9 शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close