उरळी – फुरसुंगीच्या कचर्‍यावर तोडगा निघण्याची शक्यता

May 14, 2009 8:56 AM0 commentsViews: 1

14 मे, पुणे पुण्यातल्या कचर्‍याच्या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. काल बुधवारी रात्री उशीरा महापौरांच्या निवासस्थानी पालिका अधिकारी, भाजप गटनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांची बैठक झाली. त्यात ही गावं दत्तक घेऊन, त्यांच्यासाठी विकास निधी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. उरळी -देवाची आणि फुरसुंगीच्या गावकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर सुरू केलेल्या आंदोलनानंतर अखेर आठवड्‌याभरानंतर पालिका प्रशासन जागं होताना दिसतंय. गावं दत्तक घेण्याच्या पालिकेच्या प्रस्तावावर शुक्रवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन नंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत पाठवण्यात येणार असल्याचं समजतंय. गावं दत्तक घेतल्यानंतर गावकर्‍यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या इतर वॉर्डांप्रमाणे गावांनाही ठराविक विकास निधी दिला जाईल. मात्र पालिकेच्या या प्रस्तावावर गावकर्‍यांची प्रतिक्रिया अजून समजू शकलेली नाही. दरम्यान गावकरी आणि जिल्हाधिकार्‍यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला महापौर राजलक्ष्मी भोसलेही उपस्थित आहेत. आज गुरूवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही पुण्यात आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर लवकरच कचर्‍याच्या प्रश्नावर तोडगा निघू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close