पंतप्रधानपदाच्या चर्चेत सुशीलकुमार यांचं नाव

May 14, 2009 5:12 PM0 commentsViews: 8

14 मेयुपीएचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पंतप्रधान म्हणून युपीएमध्ये चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निकालानंतर काँग्रेस पुन्हा डाव्यांचा पाठिंबा मिळवू शकते. पण त्यासाठी डाव्यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान नकोत, अशी अट घातल्यास त्याबाबत विचार होऊ शकतो, असे संकेत सोनिया गांधी यांनीच दिले आहेत. भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांचा मनमोहन सिंग यांच्यावर राग आहे. त्यामुळेच डाव्यांना पसंत पडेल असा उमेदवार म्हणून सुशील कुमार शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं आहे. डाव्यांनी याबाबत अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. पण दलित पंतप्रधान होणार असल्यास काँग्रेसप्रणित सरकारला पाठिंबा देण्याचे संकेत सीपीआयचे नेते ए. बी. वर्धन यांनी दिले होते. पण याबाबत आताच ठोस काही सांगता येऊ शकत नाही. खरं चित्र सोळा तारखेनंतरच स्पष्ट होईल. डाव्यांनी त्यांची पंतप्रधानपदाची भूमिका आयबीएन-लोकमतच्या निवडणूक विषयक कार्यक्रमात फैसला जनतेचा या कार्यक्रमात स्पष्ट केली होती. अणुकरारामुळे डाव्यांच्या मनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत काहीसा राग आहे. जर मनमोहन सिंग पंतप्रधान नसतील तर कोण अशाप्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आयबीएन-लोकमतला काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून भावी पंतप्रधान म्हणून संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टोनी, परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि सुशीलकुमार शिंदे. या तीनही व्यक्ती सोनिया गांधींच्या अत्यंत जवळच्या आहेत. ते तिघंही पक्षातले अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. पण सोनिया गांधी यांनी युपीएचे नेते कदाचित सुशीलकुमार शिंदे असू शकतील, अशी माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. पण या संकेताला काँग्रेसकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता पंतप्रधान पदाच्या चर्चेत मनमोहन सिंग, शरद पवार, ए.के.ऍन्टोनी, प्रणव मुखर्जी आणि सुशीलकुमार शिंदे ही नावं पाहता या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. सध्या शक्यता चाचपण्याची मोहीम जोरात सुरू आहे. कारण 16 मेला काय होणार आहे, याचा अंदाज अजून कोणत्याही राजकीय पक्षाला येत नाहीये. नवीन समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे. जे डावे पक्ष आपल्यापासून दूर गेले आहेत त्यांना जवळ आणण्याचा काँग्रेसचा जोरदार प्रयत्न आहे. वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेले एक्झिट पोल पाहता त्यात काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्याची चर्चा आहे. 272 चा आकडा युपीए स्वत:च्या ताकदीवर पार करू शकणार नाहीये. याची खात्री काँग्रेसला पटली आहे. कुठला नेता कोणाच्या उपयोगी पडेल हे सांगता येणार नाहीये. तसंच मायावतींचा पाठिंबा काँग्रेसला हवा असेल आणि त्यांनी जर दलित मुख्यमंत्री हवा असा आग्रह धरला तर त्यात माजी काँग्रसे नेते जगजीवन राम यांच्या कन्या नीरा कुमार, युपीमधले बडे नेते महावीर प्रसाद अणि सुशीलकुमार शिंदे ही तीन पर्यायी नावं आहेत. मात्र यात सुशील कुमार शिंदे हे सर्वात जास्त अनुभवी असल्यामुळे मायावतीं पंतप्रधान नाही झाल्या तर ते होऊही शकतील. तसंच मराठी राष्ट्रपती म्हणून पंतप्रधानही मराठी हवा त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा असल्याची हवा आहे.

close