बळीराजाला कुणी वाली नाही !

August 22, 2014 10:46 PM0 commentsViews: 431

22 ऑगस्ट : उत्तर महाराष्ट्रात कोरडवाहू तालुक्यांमधल्या लहान शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये एका त्रस्त शेतकर्‍याने कोरड्या विहिरीतच उडी घेऊन आपला जीव संपवला. तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात मश्गुल सत्ताधारी आणि विरोधक कोणत्याच पक्षांना या कोरडवाहू शेतकर्‍यांची दखल घेण्यासाठी सवड नाही.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सलग दुसर्‍या शेतकर्‍याने आत्महत्या केली. शलिक अहिरेंच्या मागे उरलेत ते शोक करणारी पत्नी जयश्री आणि 13 वर्षांचा आकाश. गेल्या काही वर्षांपासून त्यांची शेती तोट्यात चालली होती. रचलेल्या विटांची भिंत आणि सडलेल्या पत्र्यांचं छत ही त्यांच्या घराची आबाळच त्यांची खालावलेली परिस्थिती सांगतेय. पण शासनाने उशिरा का होईना, जाहीर केलेला टंचाईचा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही.

पारोळ्याचे अभिमान पाटील यांची परिस्थितीतीही वेगळी नव्हती. कर्ज काढून पेरलेलं कापसाचं बी पावसाने दडी मारल्याने उगवलंच नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये रावसाहेब बनकरांनी उडी घेतली ती कोरड्या विहिरीतच.गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या शेतात पाणी नाही. कर्ज काढून मुलीचं लग्न केलं. शेताचा तुकडा विकून पोट भरलं. पण आता जगायचं कसं हा त्यांच्या पुढचा प्रश्न.

या सगळ्यांवर पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा आहे. परतफेडीसाठी संस्थांनी तगादा लावलाय. बिलं भरली नाहीत म्हणून वीज कापण्यात आलीय. अशा परिस्थितीत सरकारचा टंचाईवरचा कार्यक्रम हा हास्यास्पदच ठरतोय. विशेष म्हणजे, 18 टक्के सिंचनानं महाराष्ट्राचं राजकारण पेटलं. मात्र, या आत्महत्या ज्या 82 टक्के कोरडवाहू तालुक्यांमध्ये होत आहेत त्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ना सत्ताधार्‍यांना सवड आहे ना विरोधकांना.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close