लातूर रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्राचार्यांचा प्रयत्न

May 14, 2009 4:10 PM0 commentsViews: 6

14 मे, लातूर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या वसतीगृहात झालेलं रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलीस आणि कॉलेज प्रशासनाकडून केला जात आहे. रॅगिंगप्रकरणी कॉलेजच्या 5 आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांनी काल परीक्षा दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. रॅगिंगप्रकरणात कॉलेजचे प्राचार्य दररोज आपली विधानं बदलत असल्यामुळे, कॉलेजकडूनही हे प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप होत आहे. या बातमीसाठी कॉलेजमध्ये गेलेल्या पत्रकारांनाही काल पोलिसांनी धक्काबुक्की केलीय. तर, रॅगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीनं अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांची चौकशी न करताच घाईगडबडीत वरिष्ठांना अहवाल दिल्याचं कॉलेजचे प्राचार्य यांनी मान्य केलं आहे. लातूरमधल्या पुराणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये 12 मे रोजी रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला. आयटीआयच्या पहिल्या वर्षाची पुन्हा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी हा प्रकार केला. या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला विवस्त्र नाचायला भाग पाडून त्याला मारहाण केली. या संदर्भात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत तिघांना अटक झाली असून दोघेजण फरार आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमणार असल्याचं प्राचार्यांनी सांगितलं होतं. तसंच याअगोदर कोणत्याही विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत तक्रार केली नसल्याचा दावा प्राचार्यांनी केला होता.

close