डॉ. बिनायक सेन यांच्या सुटकेसाठी मुंबई आणि पुण्यात रॅली

May 14, 2009 5:09 PM0 commentsViews: 3

14 मे डॉ. बिनायक सेन यांच्या सुटकेसाठी मुंबईत मानवी हक्कांसाठी लढणार्‍या संघटनांनी रॅली काढली होती. यात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य लोक सहभागी झाले होते. बिनायक सेन मुक्तता सिमतीच्या पुढाकाराने हा मोर्चा निघाला होता. पुण्यातही शेकडो कार्यकर्ते अलका टॉकीज चौकात जमले त्यांनी पत्रकं वाटून घोषणा दिल्या. नंतर या कार्यकर्त्यांनी भाजपच्या ऑफिसवर मूक मोर्चा काढला.डॉ. सेन यांना दोन वर्ष कोणत्याही पुराव्याअभावी जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, हे लोकशाहीचं लक्षण नाही असं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. मानवी हक्कांची पायमल्ली करणार्‍या छत्तीसगड सरकारने लवकरात लवकर डॉ. सेन यांची जामिनावर मुक्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. सेन यांना पाठींबा देण्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र येत आहेत. सल्वा जुडुमच्या नावाखाली अदिवासींच्या जमिनी हस्तगत करण्याच्या विरोधात लढणार्‍या डॉ. सेन यांना राजकीय आकसापोटी अटक झाली, असा या संघटनांचा आरोप आहे. मानवी हक्कांसाठी काम करणारे डॉ. बिनायक सेन यांना छत्तीसगड सरकारने नक्षलवादी असल्याच्या संशयावरून अटक केली होती. ते नक्षलवादी नसून मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांना तुरूंगातून सोडण्यात यावं अशी मागणी भारतात आणि जगभरातून केली जातेय. गेली 2 वर्षं ते तुरूंगात आहेत. डॉ. सेन यांनी दुर्गम तसंच आदिवासी भागात गरिबांसाठी वैद्यकीय सेवा केली आहे. डॉ. सेन यांना 'जोनाथन मॅनऍवॉर्ड फॉर ग्लोबल हेल्थ अँड ह्युमन राईट्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळाला तेव्हाही ते तुरूंगातच होते. सध्या त्यांना हृदयविकाराचा त्रास होत आहे.

close