पंतप्रधानपदासाठी तिसरी आघाडी भक्कम करण्याचा पवारांचा प्रयत्न

May 15, 2009 9:11 AM0 commentsViews: 3

15 मे, पंतप्रधानपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार शरद पवार यांचे आता तिसरी आघाडी अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे तिसर्‍या आघाडीला एकसंध ठेवण्यासाठी मित्रांची जुळावाजुळव सुरु झाली आहे. शरद पवार यांनी फोनवरुन समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांच्याशी संपर्क साधल्याचं समजतंय. याअगोदर अमरसिंग यांनीही पवारांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आताही गरज पडल्यास अमरसिंग पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देतील असे अंदाच व्यक्त करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे एनडीए आणि यूपीएची आपलं सरकार स्थापन करण्यासाठी साधारण 70 ते 80 खासदारांची जमवाजमव सुरू आहे. त्यामुळे तिसर्‍या आघाडीतील मोठ्या पक्षांना फोडण्यासाठी एनडीए आणि यूपीएध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत छोटे प्रादेशिक पक्ष आपसात समझोता करून सत्ताधारी पक्षात सामील होण्याच्या तयारीत आहेत. या पाश्‍र्वभूमीवर पंतप्रधानपदासाठी जोर धरताना डाव्या पक्षांचा विरोध पत्करून तिसर्‍या आघाडीला एकसंध ठेवणं हे शरद पवारांसमोर आव्हान आहे. राजकीय सत्तेवर अधिराज्य गाजवण्यासाठी सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात जुगलबंदी सुरू असताना काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी भाग पाडणं हा शरद पवार आणि डावे पक्ष यांच्यातल्या रणनितीचा एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच उद्या मतमोजणीनंतर प्रत्यक्ष आकडे हातात आल्यावर डाव्या पक्षाने तिसर्‍या आघाडीची बैठक बोलवल्याचंही समजतंय. अशा प्रकारे राजकीय डावपेच खेळून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव झाल्यानंतर उद्या मतमोजणीनंतर प्रत्यक्ष राजकीय गणितं समोर येतील आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या तर कोण कोणावर मात करणार याचा निकाल लागेल. पंतप्रधान होण्यासाठी अडवाणींप्रमाणेच शरद पवारांनाही पंतप्रधान होण्याची ही शेवटची संधी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धीबळाच्या पटावर शह कटशहाच्या राजकारणात कोण पंतप्रधानपद होणार, कोणाचं सरकार सत्तेवर येणार याची उत्सुकता सर्वत्र दिसून येतेय.

close