सूर्यकांता पाटील, पाचपुते लवकरच भाजपमध्ये -खडसे

August 25, 2014 7:10 PM0 commentsViews: 4284

NCP vs BJP in election25 ऑगस्ट : राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री भास्करराव खतगावकर, राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुते सोबतच विजय गावित, किसन कथोरे भाजपात येणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जाहीर केलंय. यापैकी काही जणांना येत्या आठ दिवसात प्रवेश देणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलं.

याव्यतिरिक्त आघाडीचे माजी आमदार आणि खासदारांची संख्याही 24 ते 25 इतकी आहे. या सर्वांना टप्प्या-टप्प्याने प्रवेश देणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि माझी भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असा खुलासा खडसे यांनी केलाय.

भाजपमध्ये प्रवेश घेणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवेश हा गाळणीकरुनच देण्यात येणार आहे. प्रवेश जरी दिला तरी उमेदवारी दिली असं काही नाही. जो कुणी भाजपमध्ये प्रवेश करेल त्याची राजकीय पार्श्वभूमी आणि ज्या ठिकाणाहून प्रवेश केला आहे तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल त्याची काय भूमिका आहे हे पाहूनच पुढचा निर्णय घेतला जाईल असं हे खडसे म्हणाले. भाजपमध्ये फक्त काम करण्याची इच्छा असणारे असे 32 जणांची कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये येण्याची तयारी असल्याचंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला आहे. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुते यांनीही राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचे नेते आणि अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर काँग्रेसमधून बाहेर पडले आहे. एकीकडे स्थानिक स्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेची वाट धरली आहे तर भाजपच्या गळाला मोठे मासे लागले आहे. अजून निवडणुकांच्या तारखा जाहीर होणे अजून बाकी आहे मात्र त्याअगोदरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close