त्रिशंकू लोकसभेच्या शक्यतेमुळे राष्ट्रपतींची कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत

May 15, 2009 2:08 PM0 commentsViews: 2

15 मे पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभेची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यालयात कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करायला सुरुवात केली आहे. निवडणूक निकालानंतर कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे प्रतिभाताईंनी कायदेतज्ज्ञांशी बोलायला सुरुवात केली आहे.'आयबीएन लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींनी घटना तज्ज्ञांशी सल्लामसलत करायला सुरुवात केली आहे. जो पक्ष वा आघाडी 272 खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र देईल त्यालाच राष्ट्रपती सत्तास्थापन करण्यासाठी सांगतील अशी माहिती कानावर आली आहे. यापूर्वी 1998 साली राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी अशीच भूमिका घेतली होती. तेव्हा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अटलबिहारी वाजपेयी यांनी तशाप्रकारे 272 खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं होतं. त्यामुळं एनडीएचं 24 पक्षांच्या आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं. 1996 साली राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी सर्वात जास्त जागा असलेला पक्ष हा निकष लावून भाजपला बोलावलं होतं. पण हे सरकार फक्त 13 दिवसात पडलं. त्यामुळे नारायणन यांचाच फॉर्म्युला योग्य असल्याचं उघड झालं आहे.

close