ग्राऊंड रिपोर्ट : छगन भुजबळ आणि येवला

August 26, 2014 1:11 PM0 commentsViews: 1609

Chagan Bhujbal

दीप्ती राऊत,नाशिक

26 ऑगस्ट : पैठणीसाठी प्रसिद्ध येवला तालुका मतदारसंघ म्हणून गाजला तो भुजबळांच्या कारकीर्दीत. पाणी आणि पैठणी हे इथले सामाजिक मुद्दे आता राजकीय झालेत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून येवल्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विकासाचं मॉडेल म्हणून भुजबळांनी येवल्यात सर्व ताकद ओतली पण तो विकास फसवा असल्याचा दावा विरोधक करताहेत.

चौकातल्या हॉटेलपासून राज्यव्यापी पैठणी पर्यटन केंद्रांपर्यंत, भुजबळांनी उद्घाटनांचा धडाका लावला आहे.

गेल्या 10 वर्षांपासून छगन भुजबळ येवला मतदारसंघाचं विधानसभेवर प्रतिनिधित्व करताहेत. एक काळ असा होता की एकेक करत येवल्यातले सर्व विरोधक भुजबळांनी खिशात घातले होते. पण लोकसभेची निवडणूक झाली आणि सगळं चित्रच पलटलं. येवला मतदारसंघातूनही राष्ट्रवादीपेक्षा भाजपला 50 हजार मतं जास्त मिळाली. अर्थात, विधानसभेची गणितं वेगळी असल्याचं साहेबच सांगतात.

केवढा विकास केला, काय काय सांगायचं, पाणी हा इथला सर्वात मोठा प्रश्न सोडवला, रस्ते बांधले, जॉगिंग ट्रॅक, ट्रॅफिक पार्क, महात्मा फुले नाट्यदालन, तात्या टोपे स्मारक, अहिल्यादेवींचा पुतळा, मुक्तिभूमी, इमारतींचं नूतनीकरण आणि आता पैठणी पर्यटन केंद्र. पण विरोधक म्हणताहेत हा विकास फसवा आहे. शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील त्यापैकीच एक. इमारती बांधल्या म्हणजे विकास झाला असं नाही, असं त्यांचं म्हणण आहे. येवल्यातल्या नागरिकांच्या अगदी परस्परभिन्न प्रतिक्रिया आहेत. आमच्या गावात बंधारे बांधले, पाणी आलं, पूर्वी काहीच साधनं नव्हती पण आता विकास झाला असं नागरिकांचं म्हणणं आहे.

याला काय विकास म्हणायचा का? एखादा कारखाना आणला असता, शिक्षणसंस्था उभी केली असती तर लोकांना रोजगार मिळाला असता, शिक्षणाची सोय झाली असती. पाणी आणू अशी आश्वासनं दिली मात्र अजून पाण्याचा पत्ता नाही असं पाणी हक्क कृती समितीचं म्हणणं आहे.

येवल्यात रस्ते, इमारती आणि स्मारकं भरपूर झाली, पण शेवटच्या माणसाच्या उत्पन्नात किती भर पडली?

बारामतीनंतर येवला हे विकासाचं मॉडेल बनावं यासाठी भुजबळांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद, पर्यटनमंत्री, आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातलं ज्येष्ठत्व, सारी ताकद पणाला लावली. त्यातून येवल्याचा बदललेला चेहरा सर्वांच्या पुढ्यात आहे. इतरही बरेच बदल झाले. कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर झाले, कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ते झाले. येवल्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदलले हा खरा प्रश्न आहे. पण तो प्रश्न ज्यांनी विचारायचा ते विरोधक मात्र इथे क्षीण झालेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close