काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला स्वबळाचा नारा

August 31, 2014 7:27 PM0 commentsViews: 953

31  ऑगस्ट : राष्ट्रवादी-काँग्रेसमधला जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाही आहे. राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 288 जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

मुंबईतल्या टिळक भवनात राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या 114 जागांवर काँग्रेस आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतं आहे. यावेळी काँग्रेसच्या इच्छुकांनी स्वबळावर विधानसभा निवडणुक लढवण्याची जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या घोषणाबाजीने काही वेळ टिळक भवन दणाणून गेलं होतं. त्यामुळे आज दिवसभर टिळक भवनात काँग्रेसच्या स्वबळाचीच चर्चा रंगली होती.राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, पण आघाडीतली बिघाडी अजूनही कायम आहे.

काँग्रेसने त्यांच्या कोट्याच्या 174 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या आधीच घेतल्या होत्या. पण, राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व 288 जागांसाठी मुलाखती घेतल्यापासून काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 114 जागांवर काँग्रेस आता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, 288 जागांच्या मुलाखती घेत असलो तरी सर्वच जागा लढणार असं नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close