मी राजीनामा देणार नाही- नवाझ शरीफ

September 2, 2014 12:54 PM0 commentsViews: 843

nawaz sharif
02 सप्टेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपण राजीनामा देणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 2 आठवड्यांपासून तेहरीक ए इन्साफचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानात आंदोलन सुरू केलं आहे. शनिवारपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पण आंदोलकांचा दबावाखाली न झुकता पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपण राजीनामाही देणार नाही असं शरीफ यांनी स्पष्ट केलं आहे. इस्लामाबादमध्ये काल राजकीय नेत्यांची बैठक झाली, राजीनामा देऊन आपण चुकीचा पायंडा पाडणार नाही, असं शरीफ यांनी या बैठकीत म्हटल्याचं वृत्त पाकिस्तानच्या मीडियाने दिलं आहे.

दरम्यान, काल संध्याकाळी पुन्हा एकदा तेहरीक ए इन्साफच्या निदर्शकांनी पाकिस्तानच्या सचिवालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रूधूर सोडला. यात सहा जण जखमी झालेत. या प्रकरणी इम्रान खान आणि कादरी यांच्यावर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आलं आहे. शरीफ राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close