पुण्यात सीपीएमच्या ऑफिसवर हल्ला

September 2, 2014 4:22 PM0 commentsViews: 1207

pune cpm office02 सप्टेंबर: पुण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यलयाची तोडफोड करण्यात आली आहे. अप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर 10 ते 15 अज्ञात लोकांनी अचानक हल्ला करुन तोडफोड केली. हल्लेखोरांनी यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांना धक्काबुक्कीही केली. हा हल्ला का आणि कुणी केला याची माहिती आली नसून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास 10 ते 15 जणांनी पुण्यातील नारायण पेठेत गाडगीळ मार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. केरळमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करतात याचा सूड घेण्यासाठी आम्ही आलोत असं सांगून हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड करून केमिकल सारखं द्रव्य फेकलं असा आरोप माकप नेते अजित अभ्यंकर यांनी केलाय. पुण्यातच डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून होतो, तिथंच आमच्यावर हल्ला होतो हा योगायोग नाही असंही अभ्यंकर म्हणाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.

विशेष म्हणजे सीपीआयएमच्या ऑफिसवरील हल्ल्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी नक्षलवादी आणि भाजयुमोनं हल्ला केला होता. सोमवारी कर्नाटकमध्ये कन्नूर जिल्ह्यात माकप कार्यकर्त्यांनी आरएसएस कार्यकर्त्याना घेऊन जाणार्‍या गाडीवर हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मनोज नावाच्या एका आरएसएसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. कन्नूर जिल्ह्यातील घटनेची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात माकप कार्यालयावर हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही.

आरएसएसवर हल्ल्याचा आरोप चुकीचा -बापट

मात्र, संघाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असावा हा आरोप भाजपचे आमदार गिरीष बापट यांनी फेटाळून लावला आहे. आरएसएसने हा हल्ला केलेला नाही. कुठंही हल्ला झाला की पहिला संशय आरएसएस आणि भाजपवर का घेतला जातो? या हल्ल्याची पोलिसांना चौकशी तरी करू द्या मग नंतर आरोप करा असं मत बापट यांनी व्यक्त केलं. तसंच ज्या पक्षाचा हिंसेवर विश्वास आहे त्यांनी आम्हांला अहिंसा शिकवू नये. माकप नेत्यांची डोकी फिरली आहेत. संघावरचे आरोप चुकीचे आहे असंही बापट म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close