राज्यात राष्ट्रवादीला मिळाल्या फक्त 8 जागा : अपयशाला नाही कोणी वाली

May 16, 2009 2:01 PM0 commentsViews: 136

16 मे अमेय तिरोडकर यंदाच्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची अपेक्षा मोठी होती. महाराष्ट्रातून किमान पंधरा जागांची. पण मिळाल्या फक्त आठ जागा. पवारांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा भावनिक करत त्यांचं राजकारण सुरू होतं. पण, जागा आल्या फक्त आठ . यावरून महाराष्ट्र राज्यातल्या जनतेने राष्ट्रवादीला झिडकारलं असल्याचं आता अगदी स्पष्ट झालं आहे. पण याची अजितदादा पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यापैकी कोणीच जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाहीत.अजितदादा पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील या तरूण तुर्कांवर राष्ट्रवादीने काही मतदारसंघांची जबाबदारी सोपवली होती. पण, नेमक्या त्याच जागांवर पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे पवार, पाटील आणि वळसे-पाटील या एरव्हीच्या फेव्हरेट नेत्यांच्या क्षमतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. दिलीप वळसे पाटील शिरूरमधल्या आंबेगांवचे. त्यामुळे शिरूर मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पण, सेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ती दिलीप वळसे-पाटील यांना पेलवू दिली नाही. 1 लाख, 78 हजार 274 मतांनी आढळराव पाटील यांनी बाझी मारली आहे. शिरूर मतदारसंघातले एकमेव भाजपचे आमदार बाबुराव पाचरणे यांनाही पवारांनी पक्षात घेतलं. असं असूनही राष्ट्रवादीचा उमेदवार इथं हरला. पक्षाने शिवाजीराव कर्डीलेंसारखा खंदा उमेदवार देऊनही वळसे-पाटील ही जागा पक्षाला देऊ शकले नाहीत. जयंत पाटील यांना पक्षाने विश्वासाने गृहखातं दिलं. त्यांना आपल्या घरच्याच हातकणंगले मतदारसंघावर लक्ष घालायला सांगितलं होतं. पण तिथे निवेदीता माने तब्बल पंचाण्णव हजारांनी हरल्या. अजितदादा तर पवारांचे पुतणे. ते जिथे प्रचाराला जातील ती जागा येईल असं एरव्ही पक्षात म्हटलं जातं. पण, मावळ, बीड, परभणी या जागा राष्ट्रवादीने गमावल्या. पुण्यात प्रचाराला न गेलेल्या अजितदादांच्या जखमेवर मग सुरेश कलमाडींनी मीठ चोळलं. सुरेश कलमाडी यांनी विजयी होताक्षणी राष्ट्रवादीवर टीकासत्र सोडलं. राष्ट्रवादीचे अजित पवार आपल्या प्रचारासाठी न आल्याबद्दल त्यांनी आनंदच व्यक्त केला. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीतले मतभेद आता जागोजागच्या मतदारसंघात दिसू लागलेत. त्यामुळे आपली जबाबदारी पार न पाडणारे हे नेते आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का याबद्दल आता राष्ट्रवादीतच चर्चा सुरू आहे.

close