मराठवाड्यात युतीचं वर्चस्व

May 16, 2009 2:19 PM0 commentsViews: 4

16 मेमराठवाड्यातील आठपैकी पाच जागांवर शिवसेना-भाजप तर तीन जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत तर केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. शिवसेनेचे औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे जालन्याचे खासदार रावसाहेब यांनी हॅट्रीक साधली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांचे मेव्हुणे भास्करराव खतगावगावकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार संभाजी पवार यांचा 74 हजार मतांनी पराभव केला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमधून कॉंग्रेस पक्षाचे जयवंतराव आवळे अवघ्या 7975 मतांनी विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या सुनील गायकवाड यांचा पराभव केला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पदमसिंह पाटील विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांचा अटीतटीच्या लढतीत पावणेसात हजार मतांनी पराभव केला. या विजयामुळे डॉ. पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा संजीवनी मिळाली. मराठवाड्यातील इतर पाच लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांना चारीमुंड्या चीत केलं. मुंडे यांनी तब्बल एक लाख 44 हजार इतक्या मतांनी विजय मिळवला. मराठा मतदारांनी जातीय प्रचाराविरूध्द मतदान केल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी हॅट्रीक साधत काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांचा .33 हजार मतांनी मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांना एक लाख 48 हजार मतं मिळालीत. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा आठ हजार मतांनी पराभव करीत सलग तिसर्‍यांदा निसटता विजय मिळवला. परभणीतून शिवसेनेचे गणेश दूधगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा 66 हजारमतांनी मोठा पराभव केला. हिंगोलीत केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांचाही दारूण पराभव झाला. शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांना तब्बल 73 हजार मतांनी पराभूत केलं.

close