अडवाणी सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता

May 16, 2009 2:37 PM0 commentsViews: 16

16 मे,पंतप्रधानपदाचं स्वप्न भंगल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्वेच्च नेते लालकृष्ण अडवाणींना मोठा धक्का बसलाय. ते सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यासंदर्भात नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या राजकीय कारकिर्दीतून संन्यास घेण्याची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अडवाणींनी निवृत्ती स्वीकारल्यास त्यांच्या जागी विरोधी पक्षनेते म्हणून राजनाथ सिंग, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांची नावं रिंगणात आहेत. भाजपचे सरसंघचालक हेमंत भागवत यांची भेट घेऊन चर्चा केल्याचंही सांगण्यात येत आहे. या चर्चेनंतर काय घोषणा होईल,् पत्रकार परिषदेनंतर अडवाणी नेमकी काय घोषणा करतील याची उत्सुकता लागून राहिली आहे. गेली 55 वर्षं लालकृष्ण अडवाणी यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आधी स्वयंसेवक मग जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष अशा राजकीय टप्प्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकाही अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही त्यांना पक्षाकडून प्रोजेक्ट केलं गेलं. मात्र निकालानंतर युपीएने मोठी आघाडी घेत एनडीएला जबर धक्का दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून अडवाणींना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवलं जाऊ शकतं. मात्र, त्याआधीच ते स्वतःहून सक्रीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र भाजप नेत्यांनी लालकृष्ण अडवाणींच्या निर्णयाचा इन्कार केला आहे. भाजप नेत्यांना अजूनही विरोधीपक्ष नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी हवे आहेत.

close