काँग्रेसला मिळालेलं यश राहुल गांधींचं : ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची कबुली

May 16, 2009 2:48 PM0 commentsViews: 8

16 मे राहुल गांधींनी केलेलं काम आणि त्यांच्या ठाम धोरणामुळेच काँग्रेसला यश मिळालं, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देऊ लागले आहेत. या कबुलीवरून काँग्रेसमधलं एक युवा नेतृत्व ठसठशीतपणे पुढे येत असल्याचं स्पष्ट होतं.घराणेशाही चालवणारा युवराज, अपरिपक्व नेता अशी टीका करणार्‍या विरोधकांची तोंडं राहुल गांधींनी निवडणुकीच्या निकालातून गप्प केलीत. कारण 'आम आदमी'च्या सोबत राहण्याचं धोरण राहुल यांनी प्रत्यक्षपणे राबवताना मतदारांनी पाहिलं. काँग्रेसचं सरचिटणीसपद मिळालेल्या राहुल गांधींनी उच्चशिक्षित युवा कार्यकर्त्यांची फळी बांधायला सुरुवात केली. गांधी कुटुंबाच्या कर्मभूमीत उत्तर प्रदेशात त्यांनी काम करायला सुरुवात केली, तेव्हा विरोधकांनी त्यांना हसण्यावारी नेलं. रोजगार हमी योजनेवर मजुरांसोबत काम करणं असो, की दलित, गोरगरिबाच्या झोपडीत जाणं असो, राहुलची प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाला आपलंसं करणारी होती. वडील राजीव गांधींप्रमाणे सुरक्षाकडे तोडून सामान्य लोकांमध्ये मिसळणं ही त्यांची खासियतच बनली आहे. गेल्या काही दिवसात देशाने राहुल गांधींमधला कणखर नेता पाहिला. विशेषत: अणुकरारावर संसदेत त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचं कौतुक झालं. अगदी गेल्या काही दिवसात यूपीए आघाडीची जुळवाजुळव सुरू करून राहुलनी राजकीय परिपक्वता दाखवली. लोकशाहीत नेत्याला जनाधार आणि सर्वमान्यता मिळते ती निवडणुकीतून. आणि राहुल यांना ती या निवडणुकीतून मिळालीय. कारण उत्तर प्रदेश या सपा, बसपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे तब्बल 20हून अधिक खासदार निवडून आणलेत. या यशामुळे राहुल गांधीचा पुढच्या राजकीय प्रवासासाठीचा महामार्ग नक्कीच रुंदावला गेला आहे.

close