सत्तेसाठी सोनियांची सर्व आघाड्यांसोबत चर्चा

May 17, 2009 11:08 AM0 commentsViews: 7

17 मे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला फक्त 12 जागांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतल्या सर्वच पक्षांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. हे पाहता विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता काँग्रेसच्या सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. सरकार स्थापनेसाठी आघाडीतल्या सर्व पक्षांशी चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकारिणीची आज सकाळी बैठक होत आहे. उद्या सोमवारी सकाळी काँग्रेसचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 15 व्या लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणारेय. गृहखातं, अर्थखातं, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय अशी महत्त्वाची खाती आपल्याकडंच ठेवण्याचे संकेत काँग्रेसनं दिले आहेत. त्यासाठी सोनिया गांधी यांनी आता युपीएतील घटकपक्षांशी बोलणी सुरू केली आहे. यात त्यांनी लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं आहे. 15 व्या लोकसभा निवडणुकीत यूपीएने जय हो म्हणत देशभरात मुसंडी मारली आहे. सगळ्याच आघाड्यांना नेस्तनाबूत करत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला आलीय. यूपीएनं 260 जागा जिंकल्यात. तर एनडीएला 158 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसने 1991 नंतर पहिल्यांदाच चमकदार कामगिरी करत 200 च्या आसपास जागा जिंकल्यात. तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसला आघाडी मिळालीय. तर आंध्रप्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. केरळ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात यासारख्या कमकुवत राज्यांतही काँग्रेसने मुसंडी मारली आहे. कर्नाटकात मात्र भाजपने स्पष्ट आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये एनडीएचा घटक पक्ष संयुक्त जनता दलाने विजय मिळवलाय. ही कामगिरी वगळता एनडीएचा या निवडणुकीत सपाटून पराभव झाला आहे.

close