ग्राऊंड रिपोर्ट : दक्षिण नागपूर कुणाचे ?

September 3, 2014 9:33 PM0 commentsViews: 317

प्रवीण मुधोळकर, नागपूर

03 सप्टेंबर : शिवसेनेकडे असलेली दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी यासाठी भाजपचे नेते आग्रही आहेत. तर काँग्रेसमध्येही दक्षिण नागपुरातून बरेच दावेदार असल्याने इथलं राजकारण चांगलंच तापलंय.

दक्षिण नागपुरात शिवसेना सातत्याने पराभूत होत आली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजप कार्यकर्ते दर निवडणुकीत मेहनत घेतात पण इथे शिवसेनेचं नेटवर्क नसल्यानं आता या जागेवर भाजपने दावा केलाय. शिवसेना मात्र या मतदारसंघावरचा हक्क सोडेल की नाही याबद्दल शंका आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेमध्ये परतलेले किशोर कन्हेरे यांना शिवसेना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक असलेल्या शिवसंग्राम पक्षाने दक्षिणेतून प्रमोद मानमोडेंना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

लोकसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विदर्भात तोंडघशी पडल्याने आता उमेदवारीचा निर्णय घेताना काँग्रेस सावधगिरीनं पावलं उचलतंय.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण नागपूर मतदारसंघात तळागाळात जाऊन काम केलं. दक्षिणमध्ये काँग्रेसचा आमदार असूनही भाजपला 60 हजारांची आघाडी मिळाली त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींना दक्षिणेची जागा भाजपसाठी आणावी अशी विनंती केली आहे. तर काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक, गिरिष पांडव, अभिजित वंजारी हे तिकीटासाठी प्रयत्नात असले तरी दोन वेळा निवडून आलेले आणि कुठल्याही वादात नसलेल्या दिनानाथ पडोळे यांची तिकीट कापायची कोणत्या कारणावरून हा प्रश्न आहे.

दक्षिण नागपूर मतदार संघासाठी भाजप जरी आग्रही असला तरी कुठल्याही परिस्थीत शिवसेना ही जागा सोडणार नाही अशी चिन्हं आहेत. तर दिनानाथ पडोळे यांचं तिकीट कापणं अशक्य असल्यामुळे तिकीट न मिळालेले काँग्रेसचे नेते पडोळेंना मदत करतील का खरा प्रश्न आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close