उद्धवांच्या निमंत्रणानंतर शहा ‘मातोश्री’वर जाणार

September 4, 2014 5:31 PM0 commentsViews: 1178

amit shah meet udhav04 सप्टेंबर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार की नाही?, शहा ‘मातोश्री’वर जाणार की नाही? या वादावर अखेर पडदा पडलाय. उद्धव ठाकरे यांनी शहा यांना निमंत्रण दिलं असून ते शहा यांनी स्वीकारलंय आणि आज रात्री 9.30 च्या सुमारास मातोश्रीवर ही भेट होणार असल्याचं भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ‘मातोश्री’ची परंपरा आताही कायम राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबईत दाखल झाले आहे. पण कालपर्यंत त्याच्या या एकदिवशी दौर्‍यात ‘मातोश्री’वर जाण्याचा कोणताही कार्यक्रम नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे भाजप-सेनेत तणाव निर्माण झाला होता. आजपर्यंत भाजपचे सर्वच बडे नेते मुंबईत आल्यानंतर मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांची भेट घेत होते. ही परंपरा अशीच कायम राहावी अशी सेनेच्या नेत्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. यावरुन सोशल मीडियावरही बराचं वाद पेटला होता. अखेरीस आज अमित शहा मुंबईत दाखल झाले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे शहा दुपारी विनोद तावडे यांच्या घरी गेले. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी शहा यांना फोन करून मातोश्री भेटीचं निमंत्रण दिलं असून ते शहा यांनी स्वीकारलंय. आज रात्री साडेनऊच्या सुमारास शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेणार असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं. अखेरीस दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मानापमानाच्या नाट्यावर आता पडदा पडला आहे.


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close