अखेर ‘मातोश्री’वर भेट झाली !

September 4, 2014 11:13 PM0 commentsViews: 3363

amit shah in matoshri04 सप्टेंबर : अखेर ‘मातोश्री’ची परंपरा कायम राहिली. मानापमानाच्या नाट्यानंतर ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट झाली. अमित शहांनी गुरुवारी रात्री 10 वाजता मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते साधारण अर्धा तास तिथे होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत प्रीतीभोजनही केलं.

अमित शहा एकदिवसीय मुंबई दौर्‍यावर आले असता त्यांच्या कार्यक्रमात ‘मातोश्री’ भेट नसल्यामुळे एकच कल्लोळ उठला होता. अखेरच्या क्षणापर्यंत याबाबत सस्पेन्स कायम होता. अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना फोन करून भेटीचं निमंत्रण दिलं. शहा यांनीही भेटीचं निमंत्रण स्वीकारलं. संध्याकाळी षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपचा विजयी संकल्प मेळावा आटोपून अमित शहांनी ‘मातोश्री’ गाठले. शहांनी गुरुवारी रात्री 10 वाजता मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते साधारण अर्धा तास तिथे होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत प्रीतीभोजनही केलं. ‘मातोश्री’ भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नसून ही अनौपचारिक भेट असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय यावेळी अमित शहा यांच्याबरोबर भाजपचे नेते विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस तसंच महाराष्ट्राचे भाजपचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर आणि राजीव प्रताप रुडी उपस्थित होते.

 …ही भूमी बाळासाहेब ठाकरेंची -अमित शहा

…ही भूमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची असून ही भूमी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीतला तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत षणमुखानंद हॉलमध्ये झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आघाडी सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार घोटाळेबाज असून गेली 15 वर्ष यांनी जनतेला लुटलं आता यांना सत्तेवर खाली खेचण्याची वेळ आलीये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौर्‍यावर आहेत. त्यांनी दुपारी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं.  मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात शहा यांनी आघाडी सरकार टीकास्त्र सोडले. गेल्या 15 वर्षांपासून आघाडी सरकार महाराष्ट्राला लुटतं आहे. 11 हजार 88 कोटी या सरकारने खाले आहे.  आता महाराष्ट्र राज्य हे काँग्रेसमुक्त करण्याची वेळ आलीये असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास खुंटलाय आणि शेतकरी देशोधडीला लागलाय. काँग्रेसला फक्त सत्तेची काळजी आहे तर भाजपला विकासाची काळजी, असंही अमित शहा म्हणाले. राहुल गांधी मौन बाळगून आहे हेच त्यांच्या फायद्याचं आहे असा टोलाही शहा यांनी लगावला.

जागावाटपाचं काय होईल ते नेते ठरवतील, तुम्ही कामाला लागा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा उल्लेख केला. शिवाजी महाराज हे सुराज्याचं प्रतीक आहे. ही भूमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची असून ही भूमी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे असंही शहा म्हणाले.

तर देवेंद्र फडणवीस यांनी ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ असा नारा दिला. या सरकारने सिंचनात एक हजार कोटी खालले.ज्यांनी मुंबई-पुणे हायवे साकारला त्या हायवेवर अगोदरच पुढील वर्षांपर्यंतचा टोल मंजूर केलंय असा आरोपही फडणवीस यांनी केला.या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर, पेड न्यूज प्रकरणाचे याचिकाकर्ते माधवराव किन्हाळकर नांदेडचे माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close