नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

September 5, 2014 4:22 PM0 commentsViews: 5114

pm narendra modi 5 sep speech

05 सप्टेंबर : शिक्षकदिनी नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून देशभरातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. तब्बल पावणे दोन तास मोदी गुरुजींचा तास सुरू होता. यावेळी मोदींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांची मन जिंकून घेतली. यावेळी मोदींच्या हस्ते ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ योजनेचा शुभारंभही करण्यात आला. मोदी सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये रंगलेल्या या संवाद सोहळ्यातील आतापर्यंतची ही ठळक मुद्दे….

  • भारत हा तरुणांचा देश -पंतप्रधान
  • शिक्षक माणूस घडवण्याचं काम करतात – मोदी
  • देशातल्या प्रत्येक शाळेत टॉयलेट्स पाहिजेत – मोदी
  • स्वच्छता हा देशाचा कार्यक्रम व्हावा, स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी -मोदी
  • विद्यार्थ्यांनी खेळ खेळायलाच हवं -मोदी
  • रोज खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी वेळ काढा-मोदी
  • टीव्ही, कॉम्प्युटर, गेम्स यात वेळ वाया घालू नका -मोदी
  • आयुष्यात खूप काही करण्यासारखं आहे -मोदी
  • महापुरुषांचे जीवनचरित्र वाचा -मोदी
  • जर तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायचीय त्या क्षेत्रातील व्यक्तींचे जीवनचरित्र वाचा -मोदी
  • वाचन हे खूप महत्त्वाचं आहे, वाचन तुमचा बौद्धिक विकास करतं – मोदी
  • वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या झालेल्या लोकांची चरित्रं वाचा – मोदी
  • ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’योजनेचं मोदींच्या हस्ते शुभारंभ
  • प्रत्येक शाळेत टॉयलेट्स हवीत, यासाठी योजनेला सुरुवात
  • भारत हा तरुणांचा देश -पंतप्रधान

 

विद्यार्थ्यांची प्रश्न आणि मोदी

पंतप्रधान झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं असा सवाल एका विद्यार्थ्याने विचारला असता, मोदी म्हणाले, पंतप्रधान झाल्यावर जबाबदार्‍या वाढल्या आहेत, तोंडातून एकही चुकीचा शब्द उच्चारला जाऊ नये याकडेही लक्ष द्यावं लागतं. मी खूप सामान्य कुटुंबातून आलोय. त्यामुळे कधी पंतप्रधान होईन असा विचार केला नव्हता. पण कुणी मोठ्ठा माणूस होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा मोठ्ठं काम करण्याचं स्वप्न बघा. मी शाळेत असताना साधी मॉनिटरची निवडणूक सुद्धा लढवली नाही असंही मोदी म्हणाले.

जपान दौर्‍यातील आठवणी

मी आताच जपान दौर्‍यावर जाऊन आलो तिथल्या शाळा कशा आहेत हे मी आवर्जून पाहिलं. त्यांच्या शाळेत शिस्त आणि स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. तिथे लोक विज्ञान-तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर करतात. सर्वांना आदर देण्याचा जपानच्या लोकांचा गूण आवडला असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान होण्यासाठी काय करावं लागेल ?

असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला असता, मोदी सुरुवातील हसले…चला तुम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरणार असाल तर मला अजून 10 वर्ष तरी चिंता नाही असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकली. पण तुम्ही उद्याचं भविष्य आहात तुम्ही नक्की पंतप्रधान व्हावं अशी माझी इच्छा आहे. जेव्हा कधी पंतप्रधान व्हाल तेव्हा मला शपथविधीला बोलवा मी नक्की येईल असं दिलखुलास उत्तरही मोदींनी दिलं.

‘मी, टास्कमास्टर’

सरकारमध्ये तुम्ही हेडमास्तरच्या भूमिकेत आहात का ?, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला असता मोदी म्हणाले, कामं वेळेवर झाली पाहिजे यासाठी माझा नेहमी आग्रह असतो. मी शिस्तप्रिय आहे, पण ती शिस्त मी स्वत:लाही लागू करुन घेतो. माझ्यासोबत काम करणारे कर्मचारी जर 10 तास काम करत असतील तर मी 12 तास काम करतो. त्यांच्यापेक्षा जास्त काम करण्याची माझी तयारी असते. मी इथं हेडमास्टर तर नाही पण टास्कमास्टर नक्की आहे असं उत्तर मोदींनी दिलं.

जर मी शिक्षक असतो तर…

जर मी शिक्षक असतो तर विद्यार्थ्याच्या क्षमतेवर कधीच निवड केली नसती. सगळे विद्यार्थी माझ्यासाठी एक समान असते. एकच विद्यार्थी परीपूर्ण नसतो. त्यातही अवगूण असता पण त्याच्यातील चांगले गूण हेरून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. हुशार आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी कधीच फरक करू नये. सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे समजावून सांगावं असा सल्लाही मोदींनी शिक्षकांना दिला.

मी लहान होतो तेव्हा…

एका विद्यार्थ्याने मोठ्या धाडसाने आपल्या शैलीत तुम्ही लहानपणी खोडकर होता का ? असा थेट प्रश्नच मोदींना विचारला. मोदींनीही हा प्रश्न जरा अवघडच आहे. पण सांगतो, मी लहाणपणी खूप खोडकर होतो. आमच्या गावी जेव्हा एखादं लग्न असलं तर आम्ही तिथे खूप धमाल करायचो. लग्नात सनई वाजवणारी मंडळी बसलेली असायची. मग आम्ही त्यांना चिडवण्यासाठी त्यांच्यासमोरच चिंच खायचो त्यामुळे आता तुम्ही अंदाज करा जर तुमच्या समोर जर कुणी चिंच खात असेल तर काय होतं ? मग काय ते सनई वाजवणारे आम्हाला मारण्यासाठी उठायचे आणि आम्ही धूम ठोकून पळून जायचो असा बालपणीचा किस्सा मोदींनी सांगताच विद्यार्थ्यांना हसूच अवरले नाही. एवढंच नाहीतर मोदींनी आणखी एक किस्सा सांगितला. मी आणि माझे मित्र कुणाच्याही लग्नात जायचो. आमच्या सोबत एक स्टेपलर असायचं. लग्नात दोन माणसं बसलेली असेल तर आम्ही चुपचाप मागे जायचो आणि त्यांच्या कुर्त्याला जोडून त्यावर स्टेपल करायचो मग जेव्हा ती लोकं उठायची मग काय व्ह्याचं त्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. पण तुम्ही असं काही करू नका असं प्रॉमिसही त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close