वाघ म्हणवणार्‍या सेनेनं ‘मातोश्री’ भेटीसाठी गुडघे टेकले -तटकरे

September 6, 2014 6:48 PM0 commentsViews: 6402

tatkare on shivsena06 सप्टेंबर : स्वत:ला वाघ म्हणवणार्‍या शिवसेनेनं शेवटी भाजपसमोर गुडघे टेकले. शेवटी अमित शहांना ‘मातोश्री’वर या असं निमंत्रण सेनेला द्यावं लागलं जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर असं झालं असतं का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘मातोश्री’ भेटीचं तोंडसुख घेतलं. भाजपपासून आता वेगळं व्हायचंय की स्वाभिमान राखायचा याचा विचार शिवसेनेला करावा असा सल्लावजा टोलाही लगावला. मुंबई यशवंत चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी ते बोलत होते.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीवरुन युतीत मानापमानाचे नाट्य रंगले होते. अमित शहा मुंबई दौर्‍यावर आले होते. पण सुरुवातील त्यांच्या एका दिवसाच्या या कार्यक्रमात ‘मातोश्री’वर भेटीचा उल्लेख नव्हता.

तसं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. पण भाजपचा कोणताही बडा नेता मुंबईत आला तर त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमखांची भेट घेतल्याशिवाय जात नव्हते. ही परंपरा असून ती कायम असावी अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली. अखेर शहा मुंबईत दाखल झाले त्यानंतर खुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून ‘मातोश्री’ भेटीचं निमंत्रण दिलं. शहांनी निमंत्रण स्वीकारुन त्याच रात्री मातोश्री गाठली आणि उद्धव यांची भेट घेतली.

या ‘मातोश्री’ भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चांगलंच तोंडसुख घेतलं. स्वत:ला वाघ म्हणवणार्‍या शिवसेनेनं शेवटी भाजपसमोर गुडघे टेकले. शेवटी काय तर अमित शहांना ‘मातोश्री’वर या असं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन करावा लागला. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर असं झालं असतं का? अशा शब्दात सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर भाजपपासून आता वेगळं व्हायचंय की स्वाभिमान राखायचा याचा विचार शिवसेनेला करावा असा सल्लावजा टोलाही लगावला. मुंबईला वेगळं करण्याचा प्रस्ताव भाजपवाले दिल्लीत मांडतात मात्र ज्या मुंबईला आपली समजणारी शिवसेना मात्र त्याला साधा विरोधही करत नाही असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, नांदेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव यांनी राष्ट्रवादीचं विसर्जन करा अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. गणपतीला निरोप देताना आपण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत असतो. त्याचप्रमाणे या निवडणुकीत् महाराष्ट्राची जनताही राष्ट्रवादीलाच परत बोलावेल असं तटकरे म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close