चार लग्न, पैसा आणि ‘ती’!,’लेडी लखोबा लोखंडे’चा पर्दाफाश

September 7, 2014 5:21 PM1 commentViews: 6827

lady lokhande

राहुल झोरी,  मुंबई

07 सप्टेंबर :  ‘कॉमेडी विथ कपिल’ या शोमधली गुत्थी शोमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपल्या करामतीनं गुंगारा देत असते. पण खर्‍या आयुष्यात अशीच किरण ब्लास गुत्तीयारिस ही महिला गेल्या 4 वर्षांपासून इंटरपोललाच गुंगारा देतेय. अखेरीस ही महिला गेल्या आठवड्यात पुण्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकली. आतापर्यंत या महिलेनं चक्क 4 वेळा लग्न केली, नावं बदलली, आर्थिक घोटाळे केले आणि जगभरातल्या पोलिसांना चकवा दिला.

पुणं हे विद्येचं माहेरघर… पण मूळ पुण्यातील कॅम्प एरियात राहणारी किरण ब्लास गुत्तीयारिस निराळ्याच विद्येमुळे प्रकाशझोतात आलीय. पुण्याच्या कॅम्पात राहणार्‍या या महिलेनं देशोदेशीच्या पोलिसांना 4 वर्षं गुंगारा दिलाय. इंटरपोलचा अलर्ट असूनही हिनं कोट्यवधींचे घोटाळे केले, खोट्या पासपोर्टवर स्पेनहून भारतात प्रवास केले, नावं बदलली आणि 4 पुरुषांना फसवून त्यांच्याशी लग्नही केली.

कुटुंबासोबत पुण्याहून स्पेनमध्ये गेल्यानंतर किरणनं तिथल्या ब्लास गुत्तेयारिस या बँकेच्या संचालकासोबत लग्न केलं. यानंतर काही दिवसांनंतर वडिलांच्या दुकानात काम करणार्‍या भूपेंद्र राणेशी तिनं दुसरं लग्न केलं. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी स्पेनमधल्या कोर्टानं 2009 साली तिचा पासपोर्ट जप्त केला. पण अजब शक्कल लढवत, ती आपल्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात पळून आली. यासाठी तिनं स्वत:च्याच मुलीच्या हेअर स्टाईलची हुबेहूब नक्कल केली. भारतात आल्यावर किरणनं तिसरं लग्न पुण्यातील व्यावसायिक प्र्रवीण आमोलिक यांच्याशी केलं. काही दिवसांनंतरच प्रवीण यांच्याशी फारकत घेत त्यांचाच मित्र संदीप गायकवाड यांच्याशी चौथं लग्न केलं. या लग्नानंतर किरणनं कुसुम गायकवाड या नावानं नवा पासपोर्ट काढला.

हे सगळे कारनामे करत असताना इंटरपोल, महाराष्ट्र पोलीस, इमिग्रेशनचे अधिकारी यांना या महिलेसंदर्भात साधा संशयही आला नाही. हे करत असतानाच ती 4 जणांच्या मनाशी आणि त्यांच्या पैशांशीही खेळ करत होती. पण तिचा हा खेळ अखेरीस तिच्याच घरी काम करणार्‍या मोलकरणीनं खल्लास केला.

आचार्य अत्रे यांचा लखोबा लोखंडे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय, पण आता पुणे पोलिसांनी एका लेडी लोखंडेला अटक केलीय आणि ही लेडी लोखंडे पोलिसांना तीच गोष्ट सांगतेय, ती ‘म्हणजे ती मी नव्हेच…’

सध्या ही लेडी लोखंडे तुरुंगाची हवा खातेय. त्यामुळे तिचा हा बंटी आणि बबलीचा खेळ एकदाचा संपलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pravin Amolik

    Her real maiden name is Kiran Sham Idnani. Her other names from her four marriages are Kiran Blas Gutierrez, Anisha Bhupendra Raney, Anjali Pravin Amolik and the latest Kusum Sandeep Gaikwad.

close