आरपीआयच्या पराभवामुळे राज्यात उमटले तीव्र पडसाद

May 18, 2009 12:24 PM0 commentsViews: 19

18 मे, शिर्डी शिर्डी मतदार संघातून आरपीआय नेते रामदास आठवले यांचा पराभव झाल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या पराभवाला सोनिया गांधी, शरद पवार तसंच विखे पाटील कारणीभूत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. रामदास आठवले यांच्या वक्तव्यामुळे बीडमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार,सोनिया गांधी तसंच बाळासाहेब विखे पाटील यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर नांदेडमध्येही आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी धरण आंदोलन करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. ' काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून आरपीआयचा पराभव केला आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आणि खासदारांनी संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार करून काँग्रेस नेत्यांना निवडून आणलं. मात्र काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागली नाही, असं आरपीआयचे नांदेडचे उपाध्यक्ष विजय सोनावणे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं. रामदास आठवले त्यांच्या पराभवामुळे प्रचंड नाराज आहेत. ' हा माझा पराभव नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव आहे. बाळासाहेब विखेपाटील सेक्युलर नाहीत. त्यांना पक्षातून काढून टाकावं अशी मागणी मी सोनिया गांधींकडे करणार आहे, 'असंही रामदास आठवले म्हणाले. ' रामदास आठवले वेळ पाहून पक्ष बदलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, ' अशी कडवट प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. ' पक्षात मात्तबर नेते असतानाही मी पराभूत झालोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझा हेतूपरस्पर पराभव केला आहे. माझा पराभव हा धर्मनिरपेक्षतेचा पराभव आहे. अशीही प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. रामदास आठवले आणि आरपीआय नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून रामदास आठवलेंचा पराभव आरपीआय चांगलाच भोवणार आहे. मुंबईतही काँग्रेस कार्यालयासमोर आरपीआय आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांचे पोस्टर फाडले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आरपीआयच्या कार्यकर्तांना ताब्यात घेतलं. तर प्रदेश काँग्रेसचं कार्यालय टिळक भवनवर आरपीआयच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत टिळक भवनच्या काचा फुटल्या. दगडफेकीनंतर कार्यकर्ते पळाले. रामदास आठवलेंच्या पराभवाने दुखावलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विखे पाटील यांच्याविरोधात आंदोलन केलं. पुण्यात आरपीआय नेते रामदास आठवलेंच्या पराभवाला बाळासाहेब विखे पाटीलच जबाबदार असल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांंनी जोरदार घोषणा देत निदर्शनं केलीत.

close