काश्मीरमधल्या पुराच्या वेढ्यात महाराष्ट्रातले 130 जण अडकले

September 10, 2014 6:11 PM0 commentsViews: 1262

jkflood_update_ap

10 सप्टेंबर : झेलम नदीला आलेल्या महापुराने काश्मीर खोर्‍यात हाहाकार उडलेला असताना, या महापुरात महाराष्ट्रातले 130 पर्यटक अडकलेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिली आहे. या प्रवाशांच्या सुटकेसाठी राज्य सरकारही कामाला लागलंय. महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मदतीसाठी सुरेश धस जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचलेत.

गेल्या 6 दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरानं थैमान मांडलं आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये देशभरातले अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. या पुरात महाराष्ट्रातले प्रवासी अडकले असून या तडाख्यात डोंबिवलीतलं एक कुटुंबही अडकलं आहे. शिंदे पती-पत्नी आणि त्यांची सात वर्षाची मुलगी असे तिघं जण श्रीनगरमधल्या मुमताज हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर अडकले आहेत. त्यांच्याशी गेले तीन दिवस संपर्क होत नव्हता.. अखेर आज त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकलाय. बोरिवलीमध्ये राहणार्‍या अग्रवाल कुटुंबातले 6 जण काश्मीरमध्ये अडकले आहेत. गणपतीच्या सुट्टीच्या निमित्ताने अग्रवाल कुटुंब जम्मू- काश्मीरला फिरायला गेलं होतं. गेल्या 48 तासांपासून त्यांचा संपर्क तुटल्यानं त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. विक्रोळीमध्ये राहणार्‍या कांबळे कुटुंबियांची मुलगी आणि जावईही काश्मीरमध्ये अडकलेत. त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी ते करताहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुरात अडकलेले मुंबईच्या पवईमधले 12 जण आज सुखरूप घरी परतले.

 काश्मीरमध्ये पावसाचा प्रलय थांबल्यानंतर लष्कर, हवाईदल आणि एनडीआरएफ यांच्या बचावकार्याला वेग आला आहे. काश्मीरमध्ये सध्या अभूतपूर्व असं बचावकार्य युद्धपातळीवर सुरू. काश्मिरच्या खोर्‍यातले लाखो लोक अजूनही बेघर आहेत. अनेक भागात वीज नाही, पण संपर्क यंत्रणा आज काहीशी सुधारली आहे. त्यामुळे काही भागात आता फोनवरून संपर्क साधता येत आहे. लष्कराने बीएसएनलचं एक मोबाईल टॉवर कारगिलहून श्रीनगरला शिफ्ट केलं आहे.

लष्कराच्या तब्बल 329 तुकड्या लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहेत. लष्कराने 18 मदत छावण्या उभारल्यायत असूव लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. येत्या 3- 4 दिवसांत परिस्थिती अधिक सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. थोडीशी दिलाशाची बाब म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी राज्यात पोचल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही आज चॉपरमधून जीवनावश्यक वस्तू फेकत स्वत: मदतकार्यात भाग घेतला. पण, मदतकार्य ज्या वेगानं व्हायला हवं, तेवढं वेगानं होत नसल्यानं स्थानिक प्रशासनावर टीका होते आहे.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close